सामंत कुटुंबाबद्दल – सन १७७० नंतरच्या सामंत कुटुंबातील ज्ञात पिढ्यांबद्दल संक्षिप्त माहिती. ही माहिती २०१६ मध्ये दीपक सामंत यांनी रघुवीर सामंतांच्या उपलब्ध ध्वनिमुद्रण व लेखी नोंदींवर आधारून तयार करून संपादित केली. खालील कालावधी काही ठिकाणी अंदाजांवर आधारित आहे. अज्ञात वर्षे गृहीत धरली आहेत.

 • परुळेकर – सामंत – धनंजय गोत्री, यजुर्वेदी, कुडाळदेशकर, आद्य गौड ब्राह्मण, सूर्योपासक परिवार. कुलदैवत – श्री देव आदिनारायण परुळे, जिल्हा सिंधुदुर्ग. देवी –
 • कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण टप्पे – १७७० पूर्वीची कौटुंबिक वृक्षाची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
 • १७७० ते १८४० – परुळे येथे रहिवास. परुळे येथे तेव्हाचे कुटुंबपुरुष अर्जुन व कृष्णाजींचा यांचा कालावधी.
 • १८४० ते १८७६ – फोंडा घाट बावीचे भाटले येथे स्थलांतर. फोंडा घाट बावीचे भाटले येथे सदाशिव व आत्मारामांचा कालावधी
 • १८७६ ​​ते १८९० – अर्नाळा व पुढे वसई येथे स्थलांतर. १५ वर्षे  वसईत स्थायिक. वसईतील आत्माराम व उमा पाचपुतींचा कालावधी.
 • १८९० ते १९०० – सुरुवातीच्या वसई येथील शिक्षणानंतर सावंतवाडीत. शिवराम, नारायण व विठ्ठल कामधंद्यास्तव बाहेर पडले.
 • १९०० ते १९१५ – वसईतून कुटुंबाचे ठाणे येथे मुख्यालय झाले. ठाणे व बेलापूर पट्टी येथे शिवराम व विठ्ठल यांचा कालावधी.
 • १९१५ ते १९४८ – नारायण शिक्षक म्हणून बदलीवर. जगन्नाथ शिकून द्विपदवीधर व उच्चपदस्थ झाला. अंतिमतः ठाण्यात स्थायिक.
 • १९४८ ते १९८५ – रघुनाथ शिक्षणानंतर मुंबईत स्थायिक. सर्व कार्यकाल मुंबईत.
 • १९८५नंतर –       रघुनाथची मुले दादर मुंबई आणि नवी मुंबई (वाशी-नेरुळ) प्रकाश आणि दीपक.
 • १] ज्ञात प्रथम पिढी कर्ता – अर्जुन – पत्नी आणि इतर कोणत्याही मुलांबद्दल माहिती नाही. (सुमारे १७७०-७५ दरम्यान जन्म. अंदाजे १८१५-२० दरम्यान मृत्यू.) बायको – (??)   परुळे येथे आयुष्य व्यतीत केले. तपशील उपलब्ध नाहीत.
 • २] ज्ञात द्वितीय पिढी कर्ता – कृष्णाजी – पत्नी आणि इतर कोणत्याही मुलांबद्दल माहिती नाही. (जन्म १७९५-१८०० दरम्यान झाला व मृत्यू १८४५-५० दरम्यान झाला). बायको – (??);     परुळे येथे आयुष्य व्यतीत केले. तपशील उपलब्ध नाहीत.
 • ३] ज्ञात तृतीय पिढी कर्ता – सदाशिव (जन्म १८२०-२५ दरम्यान. मृत्यू १८६५-७० दरम्यान फोंडाघाट येथे) बायो (पत्नी) -(जन्म सुमारे १८२२. बायोचा मृत्यू मुलगा शिवरामच्या घरी १९१२त घणसोली येथे).   (पाटकर-अरदकर कुटुंबातील बायोशी लग्न केले व सदाशिव परुळ्याहून फोंडाघाटात गेले.) त्यांच्याकडे लग्नात हुंडा म्हणून मिळालेली फक्त एकरभराची छोटी जमीन होती व तीवरच बावीचे भाटले, फोंडा घाट येथे त्यांचे मातीचे छोटेसे कच्चे घर होते.
 • ४] ज्ञात चतुर्थ पिढीचा कर्ता – आत्माराम – (जन्म अंदाजे १८३५ फोंडाघाट. मृत्यू वसईमध्ये सुमारे १८७७-७८ मधे.)  उमा (पत्नी) – (जन्म अंदाजे १८३७ फोंडाघाटात. पुण्यात १९२७त मरण पावली.)   (कुटुंब १८७६त अर्नाळ्याला स्थलांतरित. वसईत उमाचे कुटुंब सुमारे १५ वर्षे राहिले. त्यानंतर ते मुंबई- ठाण्यात स्थायिक झाले. कामधंदा व स्थावर मिळकतही कमविली. आत्माराम यांना पाच मुलगे आणि चरितार्थाचे कोणतेही विशेष साधन नसल्यामुळे पति-पत्नींनी बावीचे भाटले, फोंडाघाट सोडून १८७६त  वसई-अर्नाळा भागात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आधी अनेक दशकांच्या काळात त्यांच्या ज्ञातीतल्या बर्याच लोकांनी यशस्वीपणे असेच केले होते. त्यांनी मुंबई जवळच्या भागात नशीब अजमावण्याचे ठरवले. मुलांनी शिक्षण घेण्याच्या, चांगल्या नोकर्‍या मिळवण्याच्या व जीवनमान सुधारण्याच्या संधि प्राप्त करण्यासाठी त्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. पुढील १५-२० वर्षात तो बर्याच अंशी यशस्वी झाला. सारे कुटुंब सुस्थित झाले. उच्च पदवी मात्र त्यांच्यातल्या फक्त एकालाच (सर्वात धाकट्या जगन्नाथाला) मिळवता आली. पदव्युत्तर दर्जापर्यंत पोचता आले. सामंत हे जगन्नाथाचे मोठे चिरंजीव. पुढे ते वडिलांचा अपेक्षाभंग करून शिक्षक झाले व साहित्यिक झाले.

आत्मारामउमाचे पाच पुत्र 

 • विष्णू (१८६०-१८७८) फोंडा घाट येथे मृत्यू   
 • शिवराम (१८६२-१९१६)   
 • नारायण (१८६४-१९२८) 
 •  विठ्ठल (१८६७-१९२८  
 •  जगन्नाथ (१८७३-१९४७)

बावीचे भाटले, फोंडा घाट येथून देवगड मार्गे फतेमारीतून अर्नाळा-वसईत दाखल झाल्यावर अल्पकाळात आत्माराम मृत्यू पावले. सन १८७८ नंतर उमाने एकटीने संसार पुढे रेटला. सर्व काही सुरळीत स्थिरस्थावर केले. मुलांना शिकविले व उद्युक्त केले.

उमाच्या पाच पुत्रांचा संक्षिप्त तपशील ( उमा ‘पाचपुती’ व तिचे पाच पुत्र)

 • १) विष्णू (१८६०-१८७८) – वडील आत्माराम यांच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी व म्हाताऱ्या बायो आजीला वसईला आणण्यासाठी त्याला त्याची आई उमा हिने फोंड्याला पाठविले. मात्र दुर्दैवाने १८ वर्षे वयाच्या या अविवाहित तरुणाचा मृत्यू  फोंडाघाटात टायफॉइड होऊन झाला. बायो आजीला त्यानंतरची कित्येक वर्षे फोंडा घाटातच एकटीने काढावी लागली. तिला १९१०च्या आसपास विठ्ठलने ठाण्याला आणले. त्यानंतर बायो आजीचा मृत्यू शिवरामच्या घणसोली येथील राहत्या घरात १९१२ मधे उतार वयात नव्वदीत झाला.
 • २) शिवराम (उर्फ अप्पा) (१८६२-१९१६) – पत्नी पार्वती (‘बाई’) (१८६४-१९१६)) शिवराम फक्त  ४-५ मराठी इयत्ता पास होता. त्याला वडील अकाली वारल्यावर शिक्षण सोडून आईला घर चालविण्यासाठी मदत करावी लागली. वडील व मोठा भाऊ विष्णू फार थोड्या अंतराने निधन पावले. त्या समयी शिवराम हा जेमतेम १५ वर्षांचा होता. आईला त्याच्या मदतीची गरज होती. त्याने लवकर लहान वयातच काम करून पैसे कमविण्यास सुरवात केली. तो सरळपणे काम करणारा माणूस होता आणि त्याने आपल्या मालकाचा विश्वास जिंकला. सुरुवातीच्या तरुण वयात त्यांनी फार निष्ठेने सेवा दिली. त्यानंतर त्यांनी खानावळीचा स्वत:चा यशस्वी व्यवसाय मुंबईत गिरगावात केला व नंतर घणसोली येथे उत्पादन शुल्क विभागाचा मद्य परवाना मिळवून पळी सुरू केली. काही वर्षांतच तो घणसोलीतील एक श्रीमंत आणि भातशेती करणारा मोठा जमीन मालक बनला. त्याला स्वतःचे मूल नव्हते. त्याने आपले दोन भाऊ विठ्ठल आणि जगन्नाथ यांच्या सल्ल्याविरुद्ध पुतण्या वासुदेव (नारायण उर्फ ​​तात्याचा पुत्र) याला दत्तक घेण्याचे ठरविले. वासुदेवाच्या गैरवर्तनाच्या घटनांच्या आधारे वासुदेव याच्याबद्दल त्या दोघां काकांचे मत फारच प्रतिकूल होते. तरीही ते दत्तविधान पार पडले. अशा प्रकारे त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाआधी शिवरामांनी वासुदेवला दत्तक घेतले. त्यानंतर वर्षभरातच अचानकच १९१६ मध्ये दिवाळीच्या सुमारास शिवरामचा अनाकलनीय मृत्यू झाला व पाठोपाठ त्यांच्या पत्नी बाईही वारल्या. त्या दोघांच्या निधनसमयी १९१६ मधे रघुनाथ ९ वर्षांचे होते. सामंतांच्या मनात त्यांचे शिवराम (अप्पा) काका एक प्रेमळ, भयंकर मेहेनती, व उमा आजीचा हुकमी मुलगा व घरातल्या साऱ्याना संभाळून घेणारे होते. ते अचानक वारल्याची बातमी घणसोलीहून ठाण्यात आल्याने  साऱ्यांना मोठाच धक्का बसला. असे अचानक कसे झाले ही भावना सर्वांच्याच मनात आली होती. सारेजण त्यांचेकडे घरातला प्रमुख, कर्ता व सर्वांवर वचक असणारा पुरुष म्हणून पहात असत.
 • ३) नारायण (उर्फ नाना) (१८६४-१९२८) – पत्नी लक्ष्मी (१८७०-१९०८). नारायण फक्त व्हर्नाक्युलर फायनल पूर्ण करू शकले. नंतर वसई सोडून सावंतवाडी येथे हायस्कूल पुरे करण्याचा प्रयत्न त्या साऱ्या भावांनी केला. पण त्या दरम्यानच नारायणांचे लग्न झाले व ते सरकारी शाळेत शिक्षक म्हणून लागले. ते बदलीवर ठिकठिकाणी फिरले. १९०८मधेच (रघुनाथचा जन्म होण्यापूर्वी) त्यांची पत्नी मरण पावली. नारायण यांना चार मुलगे आणि एक मुलगी होती. नारायणांनी केलेल्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या वाटणीच्या केसमुळे,  विठ्ठलराव आणि जगन्नाथपंतांच्या घरातील मंडळी त्यानां कुटुंबातील ‘खलनायक’ मानीत. त्यांचे दोन भाऊ (शिवराम आणि विठ्ठल) आपापल्या मेहनतीवर व हिकमतीने व्यवसायात यशस्वी झाले होते आणि १९१० पर्यंत श्रीमंत झाले होते, तर जगन्नाथ उच्चशिक्षित होते आणि १९१० नंतर त्यांची चांगल्या सरकारी पदावर नियुक्तीही झाली होती. नारायणांचा मोठा मुलगा यशवंत (ऊर्फ दादा १८८९-१९७२) १९१७-१८ च्या सुमारास मॅट्रिक झाला व जीआयपी रेल्वे मध्ये काम करी. त्याला मॅट्रिक होईतो काका जगन्नाथ यांनी खूप मदतही केली. यशवंत हे अतिशय साध्या सरळ चारित्र्याचे होते. वासुदेव (उर्फ तात्या १८९२-??) हे शिक्षणात यथातथा होते. शिक्षण अर्धवट सोडून काही काळ त्यांनी एका डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम केले. १९१५मधे त्यांना काका शिवराम (अप्पा) यांनी दत्तक घेतले. शिवरामच्या मरणानंतर त्यांना ओघानेच त्यांची सारी मिळकतही प्राप्त झाली. विठ्ठलराव व जगन्नाथ यांच्या दृष्टीने वासुदेव ही कुटुंबातील एक कुख्यात व्यक्ति होती. त्यांनी वडील नारायण यांच्याबरोबर संयुक्त कौटुंबिक प्रकरणात हातमिळवणी करून केस केली होती. चंद्रभागा (उर्फ अक्का) (१८९५-१९६३) ठाकुरांकडे लग्नात दिली होती व एक असहाय्य विधवा म्हणून परतली होती. त्यानंतरचा लक्ष्मण प्रकृतीने फारच नाजूक होता (१९००-१९१२) व तो लवकरच मरण पावला. शेवटचे पांडुरंग (उर्फ पीएन) (१९०५-१९८८) होते. त्यांनी आख्ख्या जन्मात काहीही केले नाही. त्यांनी शाळा सोडली होती. एक कर्तृत्वशून्य व्यक्ती. शिवरामांच्या मृत्यूनंतर, विठ्ठलरावांच्या इस्टेटीचा भरीव भाग मिळविण्यासाठी केस केल्यानंतर नारायण यांनी आपले उरलेले दोन भाऊ विठ्ठल आणि जगन्नाथ यांचा तिरस्कारच केला. या सर्व कारणांमुळे विठ्ठलराव ठाणे सोडून निघून गेले आणि नाशिकमध्ये स्थायिक झाले. आपली आई उमा हिच्या आग्रहाखातर आणि तिच्या उपकाराचे ओझे शिरावर नको या भावनेने त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा  नारायणाला दिला व ते नाशिकला निघून गेले. न्यायाधीश असलेल्या जगन्नाथ यांच्या बरोबर  मोठा भाऊ विठ्ठल यांचे संबंध कायमच सलोख्याचे होते. यामुळे ठाणे सोडून नाशिकला स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी आपली ठाण्यातली सामंतवाडी ही सर्व मिळकत जगन्नाथला सोयीच्या अटी-किंमतीसह विकत देऊन टाकली.
 • ४) विठ्ठल (उर्फ अण्णा) (१८६७-१९२८) याच्या दोन बायका होत्या. पहिली अर्नाळ्याच्या बोंद्रे कुटुंबातील होती. उमा व आत्माराम सामंत जेव्हा फोंडा घाटाहून देवगड बंदर मार्गे फतेमारी गलबतात बसून वसइ-अर्नाळ्यात (इतर कुडाळदेशकरांप्रमाणेच) स्थायिक होण्यास १८७६ मधे आले तेंव्हा ते प्रथम अर्नाळा बंदरात उतरले. त्यावेळी त्यांना बोंद्रे कुटुंबाने आसरा दिला होता. साळू बोंद्रीण ही उमा पाचपुतीची अगदी जवळची मैत्रीण. तिचीच मुलगी पार्वती विठ्ठलाची प्रथम पत्नी. तिला एक मुलगी झाली पण ती अल्पजीवी ठरली. पुढे बरीच वर्षे मूलबाळ न झाल्याने विठ्ठलाने दुसरे लग्न १९१२-१३च्या सुमारास केले. दुसर्या पत्नीपासून विठ्ठलरावाना तीन मुलगे व तीन मुली झाल्या. विठ्ठलरावांची दुसरी पत्नी कुडुस्करांकडची होती. बाळकृष्ण (उर्फ बाबू) (१९१४-१९८९), इंदू (१९१७-१९४१), कमल (१९१९-१९४४) वत्सला (१९२१-१९४४), राम (उर्फ रामभाऊ) (१९२३-२००६) व हरिश्चंद्र (उर्फ हरिभाऊ) (१९२६-१९६८). विठ्ठल (उर्फ अण्णा) एक खंबीर व्यक्ती होती. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या. सावंतवाडी येथील हायस्कूलमध्ये त्यांनी मॅट्रिक पूर्ण करण्यासाठी नाव तर दाखल केले. परंतु त्याना लवकरच समजले की त्याचेसाठी विशेषतः त्यांचेकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नव्हते त्यामुळे ते अवघड होते. लहान वयातच त्यांनी वसईमध्ये शिक्षण घेत असताना, मधुकरी मागून कुटुंबाला मदतीचा प्रयत्न केला. नंतर ते नारायण (नाना) आणि जगन्नाथ (जग्या) यांच्यासह सावंतवाडी येथे हायस्कूलसाठी गेले. तथापि, अडचणी लक्षात घेतल्यानंतर, वयाच्या १६-१७ व्या वर्षीच त्यांनी लवकरच शिक्षण सोडून नोकरी धंदा करण्याचे नक्की केले. तोपर्यंत शिवरामने आपल्या पारशी मालकाच्या दारूच्या व्यवसायातली नोकरी सोडून तो मुंबईतल्या खानावळ व्यवसायात आधीच स्थायिक झाला होता. विठ्ठल त्याच्या आधारानेच राहिला आणि चंदनवाडी स्मशानभूमीत रखवालदार, ट्राम कंडक्टर (तेव्हा घोड्याच्या ट्राम असत), केरोसीन वेंडर, अशा विविध नोकऱ्या करून सुस्थिर होण्याचा प्रयत्न केला. शेवटी पत्नी पार्वतीसह डिलाइल रोडवरच्या एका गिरणी जवळ चहा स्टॉलही चालविला. परंतु अशी ८-१० वर्षे व्यतीत करूनही त्यांना १९०२-१९०३ पर्यंत यश मिळू शकले नाही. त्यानंतर १९०४-०५ च्या सुमारास आपला मोठा भाऊ शिवराम यांचा मदतीने तेही ठाणे बेलापूर पट्टीतील रबाळे व घणसोली येथे आले आणि मद्य परवाना मिळवून पळीचा व्यवसाय सुरू केला. जमिनी घेउन भाताची लागवड केली. तो आता बदललेला माणूस होता. यश मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्यासाठी त्याने व्यापाराच्या सर्व युक्त्या योजल्या. प्रसंगी गडबडीचे व्यवहार करण्यातला धोका पत्करायलाही मागेपुढे पाहिले नाही. त्यानेही शिवरामच्या मदतीने दारूचा परवाना मिळवला शिवाय राबाडा-घणसोली येथे जमीन खरेदी-विक्रीचा दलाली व्यवसायही सुरू केला. दहा वर्षांपेक्षा कमी काळात तेही शिवरामांसारखेच श्रीमंत झाले. १९१६ मध्ये शिवराम यांचे निधन झाल्यानंतर १९१८-१९ मध्ये (नुकताच निवृत्त झालेला) त्यांचा मोठा भाऊ नारायण हा संयुक्त कुटुंब वेगळे करण्याचा खटला करायला पुढे आला. त्याने विठ्ठलरावांच्या मिळकतीवर हक्क सांगून हिस्सा मागितला. १९१८-१९२२ दरम्यान हा खटला तीन वर्षांहून अधिक काळ चालला आणि सरते शेवटी सर्व भावांची आई उमा यांनी निर्णयदिल्याप्रमाणे विठ्ठलला तिच्या इच्छेपुढे नमते घ्यावे लागले. हे सारे घडताना लहानगा रघुनाथ मूक निरीक्षक होते आणि १९१५ मधल्या रघुनाथच्या आईच्या अकाली निधना नंतर वडील जगन्नाथ यांनी लवकरच दुसरे लग्न केले होते. रघुनाथ या लहान मुलासाठी सावत्र आई आली होती, थोरले प्रेमळ काका शिवराम (अप्पा) आणि घरातल्या साऱ्यांचे हवे नको पहाणारी त्यांची पत्नी (बाइ) वारली होती. दुसर्‍या लग्नानंतर वडिलांना हळू हळू आपल्या सरकारी नोकरीत पदोन्नती मिळत गेली. त्य़ांच्या वारंवार बदल्याही होत. उमा पाचपुतीचे एकत्र कुटुंब ही इतिहास जमा गोष्ट झाली. जगन्नाथ बदलीवर पुण्यात असताना वयोमानपरत्वे आई उमाचे निधन वय़ाच्या ९०व्या वर्षी (१९२७त) झाले.  विठ्ठलरावांनी आपल्या आईच्या इच्छेला मान देउन त्यांच्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा नारायण व त्यांच्या मुलांना दिला. झाल्या गोष्टीचा त्यांना भयंकर तिटकारा होता. त्यांच्या जीवनातले ते एक अप्रिय असे प्रकरण होते.  मग विठ्ठलराव कायमस्वरूपी ठाणे सोडून नाशिकमध्ये स्थायिक झाले. त्यानी नंतर जगन्नाथ व त्यांचे कुटुंबीय यांचेशी विशेष संबंध राखले.. त्यामुळेच पुढे रघुनाथ तीन वर्षे हायस्कूलसाठी नासिकला रहायला गेला आणि विठ्ठलरावांनी आपला धाकटा भाउ जगन्नाथ याला त्यांच्या पश्चात विश्वस्त म्हणून नेमले. पुढे १९४१-१९४४ दरम्यान रघुनाथने चुलत बंधु बाळकृष्ण वि सामंत यांच्या ज्योति चित्रच्या चित्रपट निर्मितीमधेही मनापासून भाग घेतला.
 • ५) जगन्नाथ (उर्फ काका) (२५/०५/१८७३-२०/०४/१९४७) – जगन्नाथ हे उमा पाचपुतीच्या पाच पुत्रांपैकी सर्वात कनिष्ठ. यांच्या दोन बायका होत्या. पहिला विवाह १८९७ मधे वसईतले प्रतिष्ठित शिवराम नेरकर यांची मुलगी गंगा (गंगली) हिच्याशी झाला. लग्न झाल्यावर ती गंगेची भागीरथी झाली. पहिली पत्नी भागीरथी (उर्फ माई) (१८८२-२४/११/१९१५) – त्यांची मुले – कृष्णाबाई उर्फ ​​लक्ष्मी (हे लग्नानंतरचे नांव) (२५/१२/१८९९-२३/११/१९८३), शांता उर्फ ​​शांती (१९०१-१९१६), भीमा उर्फ ​​भीमाताई (१९०४-१९२८), काशी (१९०७-१९२०), रघुनाथ (१९०९-१९८५) आणि आत्माराम (१९११-१९१३) तो भिवंडीत जन्मला व तिथेच जिन्यावरून पडून अपघातात वारला. दुसरी पत्नी सीताबाई (उर्फ मावशी) (१८९६-१९५५)। पहिले मूल वत्सला (??? – ???), शकुंतला (१९२० – ??) अहल्या (उर्फ विठा) (१९२३-२००५), गोविंद (१९२५-२००३)। पाच भावांपैकी जगन्नाथ हे सर्वात लहान, आणि शिकण्यात हुशार होते. दक्षिणा, फ्री बोर्डिंग, लेखनिक सेवा, पूजा सेवा या मार्गांनी मदत मिळवत त्यानी आपली शैक्षणिक प्रगती चालू ठेवली. मोठ्या भावांनीही त्याना जमेल तशी त्याला मदत केली. त्याने हळूहळू त्याचे  प्रयत्न सुरू ठेवत आपली प्रगती साधली. उमाने (आई) मन घट्ट करून तिच्या तीन मुलाना (नारायण, विठ्ठल व जगन्नाथ) वसईहून सावंतवाडीला हायस्कूल साठी पाठविले. पण लवकरच नारायण मॅट्रिक न होताच गृहस्थाश्रमी झाला व त्याने त्याच्या व्हर्नॅक्युलर फायनलच्या जोरावर शिक्षक होउन तो मार्गी लागला. विठ्ठलने मात्र अभ्यासातल्या आपल्या मर्यादा ओळखून अधिक शिक्षणाचा नाद सोडण्याचा निर्णय केला व तो सावंतवाडीहून मुंबईला आला. मुंबईत तो वेगवेगळ्या नोकऱ्या अजमावू लागला.  एकट्या जगन्नाथने हार मानली नाही. तो सावंतवाडीतच राहिला. त्याने तिथे आपल्या मामाकडे राहून त्याच्या खानावळीत वाढप्याचे काम व बाहेर अन्य मदत मिळवून आपले शिक्षण सुरूच ठेवले. सरतेशेवटी ३-४ वर्षांनंतर त्यांच्या मामाने जगन्नाथाचे लग्न आपल्या मुलीशीच लावून देण्याचा घाट घातला तेव्हा १६-१७ वर्षांचा जगन्नाथ तेथून पळून मुंबईत मोठा भाउ शिवराम याजकडे आला. त्याला कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण पुढे पूर्णत्वाला न्यावयाचे होते. तोपर्यंत शिवराम याने मुंबईत खानावळ सुरू केली होती. शिवरामच्या आधाराने तो पुढले शिक्षण करणार होता. विल्सन हयस्कूलमधून तो मॅट्रिक झाला व चांगल्या कामगिरीने जगन्नाथ यांना शिष्यवृत्ती, फ्रीशिप, नि:शुल्क निवासस्थान इ मिळत गेले आणि जोडीला त्यानी शिकवण्याही केल्या. त्यांनी १८ व्या वर्षी  मॅट्रिक (१८९१) व २२ व्या वर्षी (१८९५) बी.ए. पूर्ण केले आणि कायद्याच्या पदवीसाठी नोंदही केली. मात्र मधे एकदा प्लेगच्या साथीमुळे त्यात खंड पडला व ते थोडे रेंगाळले. त्या काळात ते आर्यन एज्युकेशन सोसायटीमध्ये क्रियाशील सदस्य झाले. तेथे तीन वर्षे शाळेत उपप्राचार्य म्हणूनही काम पाहिले. १८९८त एलएलबी पूर्ण केल्यावर त्यांनी कायदा प्रॅक्टिसमध्ये (वकिलीत) आपले नशिब अजमावले. मात्र लवकरच त्यांना समजले की वकिली ही आपल्या स्वभावाच्या व्यक्तीसाठी नाही. म्हणून त्यांनी क्लार्क ऑफ कोर्ट (शिरस्तेदार) या पदावर सरकारी सेवेत न्यायखात्यात  ठाणे येथे प्रवेश केला. पुढे ५-६ वर्षांच्या सेवेनंतर साधारण १९०७-०८ मध्ये त्यांना उप न्यायाधीश (सबॉर्डिनेट जज) म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर १९३० मध्ये निवृत्त होईपर्यंत ते त्या सेवेतच प्रगतिशील राहिले. त्यांनी कोणत्याही गुन्हेगारी खटल्यांचा निवडा केला नाही, म्हणूनच ते फक्त सिव्हिल (नागरी) शाखेत काम करीत राहिले व फौजदारी कज्जांपासून ते दूर राहिले.  त्यांचे अन्य सर्व सहकारी जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले किंवा काही जण हायकोर्टाचे न्यायाधीशही झाले. फाशी देण्याची किंवा सक्तमजुरीची शिक्षा देण्याची वेळ माझ्यावर येऊ नये असे त्याचे तत्व होते. ते केवळ नागरी प्रकरणात लक्ष घालीत. ते एक धार्मिक, नीतिमान, पापभीरू व्यक्ति होते. कोंडीबा महाराज आणि रघुनाथ महाराज पुराणिक (काका महाराज) धोपेश्वरकर यांचे ते शिष्य होते. म्हणूनच त्यानी आपल्या मुलाचे नाव रघुनाथ असे ठेवले. तथापि, नंतर दुसऱ्या लग्नामुळे त्यांच्या प्रथम पत्नीच्या सर्व चार मुलांनी (मुलगा रघुनाथ व मुली शांती, भीमा आणि काशी) खूप त्रास सहन केला. तो त्याना टाळता आला नाही. ते हतबल होते. त्या दृष्टीने त्याचे आयुष्य अपयशी ठरले.

रघुनाथचे जीवन आणि त्याचा मागोवा – रघुनाथ वैद्यकीय डॉक्टर व्हावा ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती पण ते पाहण्याचे भाग्य त्याना लाभले नाही. चुकीचा शिक्षणक्रम घेतल्यामुळे रघुनाथची  तीन वर्षे वाया गेली. रघुनाथची जडण घडण वडिलांच्या देखरेखीत उत्तम झाली. पण लहान वयात आईचे छत्र हरपणे, वडिलांचे दुसरे होणे, घरात कायम स्वरूपी सावत्रपणाचे वातावरण निर्माण होणे या ठळक घटनांचे दरगामी परिणाम सामंतांना जन्मभर भोगावे लागले. वडिलांचे दुसरे लग्न झाल्यावरही बरीच वर्षे रघुनाथ त्यांचा आवडता मुलगा होता. मात्र पुढे परिस्थिती बदलत गेली. ती कुणाच्याच हातातील गोष्ट नसावी.

बंडखोर मुलाने वडिलांच्या मनाविरूद्ध बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्यांच्यातले अंतर वाढत गेले. तो डॉक्टर बनू शकला नाही, त्याने  त्याना नको असलेला अध्यापन हा व्यवसाय निवडला. तसेच, त्याने वडिलांच्या इच्छेविरूद्ध प्रेमविवाह केला. या सर्व कारणास्तव रघुनाथला कुटुंबात त्याचे मोठा मुलगा म्हणून कधीही स्थान मिळाले नाही. रघुनाथची पत्नी व दोन मुलगे यांचाही स्वीकार करण्यात आला नाही आणि जेव्हा स्वत:ची मालमत्ता मृत्युपत्रात वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा जगन्नाथपंतांनी (वडिलांनी) रघुनाथला दुसऱ्या मुलाच्या तुलनेत बरेच दुय्यम स्थान दिले. साधारण फक्त १/३ हिस्सा रघुनाथला दिला. आपल्या दोनही नातवांना तर काहीच दिले नाही. यावरून ते (दुसर्या बायकोच्या दबावाखाली) कसे वागत असत याचा अंदाज येतो. जज्ज असलेलया, निस्पृह, पापभिरू व न्यायी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचे हे वागणे अतर्क्य वाटते. मात्र तो त्यांचा अधिकार होता हेही तितकेच खरे. त्यांना ते मनातून डाचत असावे. कदाचित यामुळेच त्यांनी आपल्या मृत्यूपत्रावर सही केली नव्हती. तरीही रघुनाथने ते मान्य केले. यात रघुनाथचा मोठेपणा, जमेल तितके जुळवून घेण्याची व मान देण्याची वृत्ती दिसते.

मात्र कदाचित रघुनाथच्या या विशिष्ट जीवनविशेषांमधेच त्याने लेखक, शिक्षक व इतर बरेचकाही होण्याचे रहस्य दडले असावे. हे सारे तपशील विचारात घेउन, रघुनाथची लहानपणापासून पोरका झाल्याने झालेली कौटुंबिक कुतरओढ, त्याची मानसिक जडण घडण, वडिलांनी घडवलेली त्याची मानसिक बैठक, तारूण्यातले पुढले त्याचे बंड, त्याच्या हातून वडिलांचा झालेला अपेक्षा भंग, त्याच्या कलात्मक वृत्तीचा कोंडमारा, त्याने लेखक होणे, त्याने शिक्षक होणे, त्याची निरीक्षण क्षमता, त्याचे लेखन विषय, त्याने रंगविलेली कथानके, त्यातील पात्रे, त्यांचे जीवन व रघुनाथ यांचे स्वतःचे जीवन यांचा काही संबंध जोडता येतो का हा  शोध वाचक व अभ्यासू सहजी घेउ शकतील असे वाटते.

*टीप – वर दिलेली सर्व वर्षे अंदाजे आहेत आणि चुकीची आढळल्यास दुरुस्तीच्या अधीन आहेत.