निर्मिति हेतु : हे संकेत स्थळ कै रघुनाथ जगन्नाथ सामंत (रघुवीर सामंत ऊर्फ कुमार रघुवीर) यांचे स्मरणार्थ निर्माण करण्यात आले आहे. ते निर्माण करून राबविण्यामागचे हेतु खालील प्रमाणे आहेत –

 • कै सामंत यांची सर्वांगीण पुनर्ओळख (एक व्यक्ति, एक विद्यार्थीप्रिय शिक्षक व एक प्रथितयश साहित्यिक म्हणून) करून देणे.
 • त्यांची सुरूवातीची ओळख (१९२७-२८ नंतर त्यांच्या वयाच्या ऐन विशीत) प्रकाशात आलेला “शब्दचित्र”कार म्हणून तसेच  (१९३२ मधे “हृदय” प्रकाशित झाल्यावर) “हृदय”कर्ता अशी झाली होती तरी त्या बरोबरीनेच (त्यांच्या वयाच्या तिशीत त्यांनी लिहिलेल्या उपकारी माणसे या कादंबरी मालिकेमुळे व नंतरही लिहिलेल्या अन्य कादंबर्यांमुळे) एक समर्थ कादंबरीकार, त्याच बरोबरीने एक कथालेखक, एक लघुनिबंधकार, एक उत्तम काव्यगायक, सांघिक गीत-लेखक अशीही होती हे विसरता कामा नये. तेही अधोरेखित करणे गरजेचे वाटले.
 • शिक्षणशास्त्र, विद्यार्थी व अध्यापन हे त्यांचे अत्यंत आवडीचे विषय होते. विद्यार्थी (क्लास व शिकवणीच्या कुबडी शिवाय) स्वबळावर संस्कारित कसे होतील याची त्यांना चिंता असे. त्यातूनच ते त्यांच्या कर्तुत्वाच्या शेवटल्या कालखंडात (त्यांचे नियोजित लेखन बाजूला ठेवून) कोशकारही झाले. या बाबी ठळकपणे मांडून समोर आणणे गरजेचे आहे असे वाटल्यावरूनही हे संकेतस्थळ निर्माण करण्याची आवश्यकता अधिकच भासली.
 • आणखी एक मुद्दा उरला तो म्हणजे रघुवीर सामंतांची कोणतीच पुस्तके आता काळाच्या ओघात उपलब्ध नाहीत. ती लोकांना कशी उपलब्ध करून देता येतील हा तो मुद्दा. त्यातून त्यांचा असा कुणी प्रकाशक नव्हता व त्यांची सारीच पुस्तके त्यांनी स्वतःच स्वतःच्या प्रकाशनामार्फत छापून ती प्रकाशित केली होती (व विकलीही होती) त्यामुळे ती आता लोकाना कशी प्राप्त होणार हा मोठाच प्रश्न होता. त्यातूनच वाचक व अभ्यासू व्यक्तिंना त्यातील कोणतेही पुस्तक त्यांच्या आवश्यकतेनुसार हवे तेंव्हा विनामूल्य उतरवून घेण्याची संधि मिळावी असा विचार पुढे आला.

निर्मिति प्रक्रिया : हे संकेतस्थळ निर्मिण्यात मध्यवर्ती भूमिका, त्या मागचा विचार व त्यांचे शब्दांकन करून ते इथे नोंदवून लोकांना सादर करून देण्याची कामगिरी कै रघुवीर सामंतांचे द्वितीय पुत्र श्री दीपक सामंत यांनी बजावली असली तरी यात “वेब साइट” (त्याचे नामकरण करून) स्थापित करणे, लिहिलेला मजकूर वाचून प्रतिक्रिया देणे, (वाक्य रचना, पुनर्लेखन, शुद्धलेखनविषयक) सुधारणा सुचविणे ही व अशी अनेक अन्य अनुषंगिक स्वरूपाची कामेही होतीच.     

 • यामधे सर्व उपलब्ध सर्व पुस्तकांचे स्कॅनिंग करणे, पृष्ठ क्रम साधून पुस्तके एकत्र लावणे (पूर्वीच्या काळी पुस्तक निर्मिति व छपाईच्या परिभाषेत त्याला “जुपणी” असे म्हणत),
 • एकंदर सुमारे ४५-५० पुस्तकांचा संच करून त्यांच्या पीडीएफ तयार करणे, त्या तपासणे व त्या साऱ्या पीडीएफ करून “अपलोड” करणे, 
 • त्या पूर्वी हे “वेब साइट” (त्याला नांव देवून) स्थापित करणे, व 
 • नंतर सर्व मजकूर-पुस्तके-संदर्भ इ ची रचना व “लिंक्स” निर्माण करणे.                                         

अशा अनेक पायऱ्यांमधून हळूहळू प्रगति करून हे संकेतस्थळ पूर्णत्वाला नेले. या सर्व कामांची जबाबदारी अन्य सदस्यांनीही घेतली आहे. त्यामुळेच हे काम आम्ही पूर्णत्वाला नेउ शकलो. या संकेतस्थळासाठी (कुणी काय काम केले हे न पहाता) काम करणारे सदस्य खालील प्रमाणे (वयाची ज्येष्ठता व कै रघुवीर सामंतांशी नात्यानुसार) –

 • श्री दीपक सामंत (वय ७५ वर्षे. कै रघुवीर सामंतांचे द्वितीय पुत्र). नवी मुंबई.
 • श्रीमती छाया देव (वय ७२ वर्षे. कै रघुवीर सामंतांची प्रथम कन्या). नाशिक.  
 • श्रीमती अश्विनी देव (वय ४४ वर्षे. कै रघुवीर सामंतांची नात). कोलंबस, ओहायो.
 • श्री ओंकार सामंत (वय ४३ वर्षे. कै रघुवीर सामंतांचा नातू). अबु धाबी, युएइ.
 • श्री केदार सामंत (वय ४२ वर्षे. कै रघुवीर सामंताचा नातू). सनी व्हेल, कॅलिफोर्निया.                                                        

यांचे वतीने

 • समस्त सामंत परिवार (भारत, अबू धाबी व अमेरिका स्थित),
 • समस्त देव परिवार (भारत व अमेरिका स्थित),      
 • समस्त पावसकर परिवार (भारत व अमेरिका स्थित)