पूर्ण नाव – रघुनाथ जगन्नाथ सामंत (उर्फ ‘कुमार रघुवीर’ / ऊर्फ ‘रघुवीर सामंत’).

जन्मकथा – त्यांच्या जन्माबद्दल एक कथा ते स्वतः सांगत ती अशी: त्यांच्या आईला पहिल्या तीनही मुलीच झाल्या होत्या. त्याकाळच्या समजुतींनुसार कुटुंबाला ‘वंशाचा दिवा’ हा हवाच असे. त्यामुळे त्यांची आई (सासरचे नांव भागीरथी – माहेरचे नांव गंगा, तिकडे  तिला ‘गंगली’ म्हणत) खूप नाराज असे. तिच्या वयाची तिशी होत आली होती अशावेळी वाईत असताना जगन्नाथपंतांनी रघुनाथ महाराज पुराणिक (काका महाराज पुराणिक धोपेश्वरकर) यांचे शिष्यत्व पत्करले. एकदा त्या पुण्यपुरुषाच्या दर्शनाला भागीरथी गेली होती. तिने त्यांचे दर्शन घेऊन प्रार्थना केली की, “महाराज, मला तीन मुलीच झाल्यात व मला आता मुलगाच व्हायला हवाय. मला तसा आशीर्वाद द्या.”  त्यावर रघुनाथ महाराजांनी (त्यांचेकडे आधी येऊन गेलेल्या कुणा भक्ताने त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले) एक रामफळ बाजूच्या ताटात ठेवले होते ते उचलून भागिरथीला प्रसाद म्हणून दिले व सांगितले, “हा प्रसाद घे. तुला यानंतर पुत्रप्रात्रीच होईल.” त्याप्रमाणे तिने तो प्रसाद ग्रहण केला व खरोखरच तिचे पुढले मूल जन्माला आले तो मुलगा होता. तो म्हणजे रघुवीर सामंत. १९०९ मधे जन्मसमयी वाईत सगळीकडे प्लेगची साथ होती व जगन्नाथपंत आपल्या सर्व कुटुंबासह कृष्णा नदीच्या तीरावर भद्रेश्वराच्या मंदिराजवळ उभारलेल्या तात्पुरत्या वसाहतीत (तंबू-राहुटीमधे) वास्तव्याला गेले होते. जन्मानंतर मग आई-वडील यांचा विश्वास म्हणून मुलाचे नाव ठेवले रघुनाथ. जज्जसाहेबांना मुलगा झाला व बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत या आनंदाप्रीत्यर्थ नंतर गावात हत्तीवरून साखर वाटली होती असेही ते सांगत. त्यांना स्वत:ला रामफळे आवडत व आमच्या घरात रामफळाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे व दरवर्षी आम्ही ते आवर्जून सेवन करतो. यामुळे मला संधि मिळताच मी १०-१२ रामफळाची झाडे लावली. आता दरसाल आम्ही आवर्जून रामफळांचा आस्वाद घेत असतो.

त्यांच्या शाळा:

 • ठाणे – ठाणे नगरपालिकेची मराठी शाळा – दुसरी, तिसरी व चौथी १९१६-१७ ते १९१८-१९
 • ठाणे – बैरामजी जीजीभाई हायस्कूल – इयत्ता ५वी व ६वी– १९१९-२० व १९२०-२१
 • डहाणू – एन. एल. अढिया हायस्कूल – इयत्ता ७ वी व ८वी – १९२१-२२व१९२३-२४
 • नाशिक – शासकीय हायस्कूल – इयत्ता ९वी आणि १०वी – १९२४-२५ते१९२५-२६
 • सांगली– सांगली हायस्कूल – मॅट्रिक १९२६-२७

त्यांची महाविद्यालये:

 • १९२७-२८ – एल्फिन्स्टन –प्रीव्हियस(सायन्स) मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
 • १९२८-२९ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (RIS) -इंटरसायन्स(अपयश). (त्र्यं. शं. शेजवलकरांनी प्रगतीमधे बोलावले व ‘शब्दचित्रे’ प्रसिद्ध झाली.)
 • १९२९-३० पुणे – फर्ग्युसन – इंटरसायन्स(अपयश). (‘प्रगती’मधील लिखाण नियमितपणे सुरूच राहिले.)
 • १९३०-३१ पुणे -फर्ग्युसन – इंटरसायन्स(अयशस्वी)
 • १९३१-३२ फर्ग्युसन – इंटरआर्ट्स पूर्ण करून ते पुन्हा मुंबईला परत आले
 • १९३२-३३- विल्सन – ज्युनियर बी.ए. – (याच काळात १९३२ च्या अखेरीस ‘हृदय’ हे शब्दचित्रसंग्रह असलेले त्यांचे पहिले पुस्तक वयाच्या २३व्या वर्षी प्रकाशित झाले व सामंत “शब्दचित्रकार”म्हणून प्रसिद्ध झाले. याच वर्षाच्या अखेरीस ‘पारिजात’ हे मासिक काढण्याचे नक्की करून जानेवारी १९३४ पासून ते सुरूही केले.)
 • १९३३-३४- झेवियर्स – अंतिम बी.ए. – सामंत पदवीधर झाले.
 • १९३५-३६ व १९३६-३७ ही वर्षे त्यांनी एम.ए. करण्यासाठी घालविली. परंतु यश मिळाले नाही. एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सामंतांचे लक्ष स्वतःच्या लेखनाकडे अधिक वळले त्यामुळे त्यांची पदवी उशीरा झाली.                                               

ळक  मुद्दे/नोंदी – सामंत सधन कुटुंबातील, वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा होते. दुर्दैवाने त्यांच्या आईचे अकाली नोव्हेंबर १९१५ मधे ऐन पस्तिशीत निधन झाले. वयाची सहा वर्षे पूर्ण होण्याआधीच रघुनाथचे मातृछत्र हरपले. आईचे स्थान जन्मभर, त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या अशा त्यांच्या मोठ्या x बहिणीने भरून काढले. वडिलांनी स्वतःच्या वयाच्या चाळिशीत असताना दुसरे लग्न केले आणि तिथून मग पुढे जन्मभर सामंतांनी सावत्रपणा अनुभवला. आपला मुलगा डॉक्टर व्हावा ही वडिलांची इच्छा ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत. बरीच अपयशे पचवून, बी.ए. झाल्यावर वडिलांना त्यांनी बॅरिस्टर व्हावे असेही वाटले. मात्र बी.टी. करून व शिक्षण संपवून ते २८-२९ वयाला वडिलांच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात शिरले. त्यांनी लग्नही स्वेच्छेनेच केले. यामुळे जणू काही त्यांचे घरातून उच्चाटनच झाले. मात्र त्यांच्या कलासक्त मनोरचनेतून त्यांनी लेखनकलेत, १५व्या वर्षी सुरुवात करुन, प्रगती केली व वयाच्या विशीतच नाव व मान्यता मिळवली.                

१९३४ ते १९३६ दरम्यान त्यांनी आपले ‘पारिजात’ मासिक चालविले आणि १९३७ मधे एम.ए. पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला पण ते अयशस्वी झाले. दिनकर साक्रीकर, वसंत यार्दी, मनोहर व यांच्या सारखेच त्यांचे अन्य मित्र आणि इतर बऱ्याच सहकाऱ्यांनी त्यावेळी एम.ए.पूर्ण केले. त्याच वर्षी मे १९३७ मध्ये वेणू गवाणकर यांच्याशी विवाह केला. विरोधात असलेल्या वडिलांना शेवटी  तो करण्यास नाइलाजाने परवानगी द्यावी लागली. सामंतांना ही परवानगी मिळवण्यासाठी जवळजवळ १२ वर्षे वाट पहावी लागली होती. ती मिळाल्यावरच त्यांनी लग्न केले. तेव्हां त्यांचे सर्जनशील लिखाण जोरात सुरू होते. ‘हृदय’ नंतर ‘सुरंगीची वेणी’, ‘वाळूतील पावले’ ही पुस्तके प्रसिद्ध  झाल्यानंतर ‘उपकारी माणसे’ ही कादंबरी मालिका लिहिण्यात ते व्यग्र झाले. पुढील काही वर्षांत लेखनाने त्यांना नांव व ख्याती मिळवून दिली. नंतर इतर बरीच पुस्तके प्रकाशित होत गेलीआणि ते लेखक म्हणून स्थिरावले. एक उत्तम शिक्षक व शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांना मान्यता होती.     

लग्न झाल्यानंतर लगेचच ते बी.टी. करण्यासाठी कोल्हापुरात गेले आणि १९३७-३८ मध्ये  बी.टी. पुरे करून त्यांनी चिकित्सक समूह या तत्कालीन मुंबईतील सुप्रसिद्ध शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. येथून पुढे (१९३८नंतर) शिक्षक, लेखक, प्रकाशक म्हणून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. शिक्षकी पेशाच्या बरोबरीनेच त्यांनी त्याचवेळी सिनेनिर्मिति, पर्यटन, मुद्रण यासारख्या नवनवीन क्षेत्रतही मुशाफिरीही केली. त्यासाठी बराच पैसा व शरम खर्च केले. यशापयशाचा जास्त विचार न करता झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती जन्मभर, अगदी निवृत्त होईपर्यंत कायम होती. कुटुंबीय व जवळचे काही सुहृद यांनी विशेष आग्रह केल्याने, स्वतः तशा लिखाणाविरुद्ध असूनही, (स्वत:ची तशी इच्छा नसताना) त्यांनी आत्मचरित्रलेखनाची तयारी केली. परंतु ते लिहायला हवी असलेली मनाची उभारी नसणे, उतारवय, ढासळती प्रकृती आणि बदलते सामाजिक वातावरण या कारणांनी ते त्यांच्या हातून झाले नाही. जरी त्यांनी आत्मचरित्र लिहिले नाही तरी त्यासाठी स्वतःच्या जीवनाविषयी केलेल्या प्रदीर्घ नोंदी मात्र आज उपलब्ध आहेत.

जीवनप्रवाहातील विविध ठिकाणे आणि टप्पे)

१) १९०९ ते १९११ – वाई येथे – वाई येथे एक लहान मूल म्हणून वास्तव्य. सर्वात मोठी बहीण कृष्णा हिचे लग्न बाराव्या वर्षी १९११-१२ दरम्यान झाले. तिला केळवे-माहीम येथील वालावलकर कुटुंबात देण्यात आले होते. लग्नानंतर ती पालघरजवळील वळण (अल्याळी-टेंभोडे) येथे सासरी रहावयास गेली. तिच्या लग्नाच्या वेळी लहानगा रघुनाथ फक्त दोन वर्षे वयाच्याआसपासहोता.

२) १९१२ व १९१३ भिवंडी येथे – मुक्काम हलला कारण वडील ज. आ. सामंत यांची नेमणूक भिवंडी येथे झाली. रघुनाथचे सुरुवातीचे बालपण भिवंडी येथे गेले. धाकटा भाऊ आत्माराम याचा जन्म भिवंडी येथे झाला होता पण तो दोन वर्षांहूनही कमी वयातच जिन्यावरून गडगडून पडल्याचे निमित्त होऊन भिवंडी येथेच मरण पावला. तेव्हा रघुनाथ फक्त चार वर्षांचा होता.

३) १९१४ ते १९२२ ठाणे येथे – भिवंडी नंतर वडील पुन्हा नव्या पोस्टिंगवर ठाण्याला आले. १९१५च्या दिवाळीनंतर काही दिवसांनी बहुदा २४-११-१९१५ रोजी ठाणे येथे आई भागीरथी (घरातले नाव ‘माई’) हिचे निधन झाले. आईचे छत्र गमावले त्यावेळी रघुनाथ सहा वर्षापेक्षा एक महिना कमीच वयाचा होता. नंतर १९१६-१७ मध्ये वयाच्या ८व्या वर्षी रघुनाथ ठाणे बरो म्युनिसिपालिटीच्या मराठी शाळेत थेट दुसरीच्या वर्गात दाखल झाला.  रघुनाथने १९१९-२० पर्यंत चौथी मराठी शाळा पूर्ण केली. १९१९-२० मधे मराठी शाळा पूर्ण केल्यानंतर ठाण्यातीलच बैरामजी जिजीभाई (बी.जे.) हायस्कूलमध्ये १९२०-२१ मधे ५वीच्या वर्गासाठी (इंग्रजीपहिली) प्रवेश घेतला व १९२१-२२ मधे ६वी पूर्ण झाल्यावर वडील डहाणू येथे बदलीवर गेले. डहाणूमधे रघुनाथ एन. एल. अढिया हायस्कूलमधे ७ वीच्या वर्गात १९२२-२३ मधे दाखल झाला.     

 ४) १९२२ ते १९२४ डहाणू येथे – रघुनाथ ७वी व ८वी ही दोन वर्षे डहाणूच्या शाळेतून होता. ठाणे येथे असताना १९१८-१९ मध्ये सुरू झालेला कौटुंबिक मिळकतीचा खटला, नंतर डहाणूत असतानाही, १९२२-२३ पर्यंत लांबला होता. ती कौटुंबिक कोर्ट केस संपल्यानंतर,वडिलांचे मोठे बंधु विठ्ठलराव (अण्णा) नाशिकला स्थायिक झाले. रघुनाथने ८वी (इंग्रजी पाचवी) डहाणू येथे पूर्ण केली. वडील (घरातले नांव ‘काका’) डहाणू कोर्टातील नेमणुकीवर होते. डहाणूहून ते कल्याणच्या कोर्टात बदलीवर जाणार होते. जेव्हा रघुनाथ इयत्ता ७वी व ८वी (इंग्रजी४थी आणि ५वी) या वर्गांकरिता डहाणू येथे होता त्या काळात त्याला डहाणूच्या शाळेत चुंबळे, पटवर्धन, पोंडा इ. सारखे मित्र मिळाले होते. डहाणूत असताना त्याने हस्तलिखित  लिहिण्याची सवय मित्र चुंबळे याच्यासमवेत विकसित केली. त्यांच्या मासिकाचे नाव होते ‘विहार’. त्या काळात रघुनाथला सावत्र आईच्या सहवासापासून दूर होण्याची तीव्र इच्छा होत होती कारण रघुनाथ सततच्या सावत्रपणाच्या वागणुकीला कंटाळला होता. कौटुंबिक नाती व वडिलांसोबतअसलेले सौहार्दपूर्ण संबंध यांना बाधा येऊ नये म्हणून, वाढता रघुनाथ स्वतंत्रतेच्या शोधात इतरत्र जाऊ इच्छित होता. त्यावेळी तो १३-१४वर्षांचा होता. चुलते विठ्ठलराव ठाणे सोडून कायमचे नाशकाला स्थायिक झाले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर रघुनाथने पुढील शालेय शिक्षणासाठी चुलते विठ्ठल (अण्णा) यांचेकडे नाशिकला जाण्याचा बेत केला. रघुनाथच्या वडिलांची –काकांची- डहाणूहून कल्याण येथे बदली होण्यापूर्वी ते काही काळ आजारी होते. कोर्ट प्रकरणातील कौटुंबिक तणावामुळे ते एकदा डहाणू येथील न्यायालयात बेशुद्ध पडले. त्यानंतर कल्याण येथे मुक्काम हलवण्या पूर्वी होण्यापूर्वी x सर्व कुटुंब नाशिकला विठ्ठलरावांकडे काही दिवस रहायला गेले. वाढत्या वयाच्या रघुनाथला नाशिक शहर आवडले. आपल्याला येथे हवा असलेला मोकळेपणा मिळेल असा विश्वास त्यांना वाटला असावा.काका (वडील) डहाणू येथे असतानाच, कौटुंबिक प्रकरण बंद होण्याच्या सुमारास, विठ्ठलरावांनी आपल्या मालकीची उतळसर,ठाणे येथील सामंतवाडी ही मालमत्ता धाकट्या भावाला प्रेमपूर्वक विकत देऊ केली. त्यांनी ठाणे सोडण्याचा निर्णय घेतलेलाच होता. त्या दोघांचे संबंध चांगले होते. म्हणून रघुनाथने पुढच्या काही वर्षांच्या हायस्कूल शिक्षणासाठी नाशिकला जायचे ठरवले. एक आईवेगळा,  वाढता मुलगा असल्याने वडिलांनी त्यांना नाशिक येथे हायस्कूलमध्ये पाठविण्यास हरकत नाही असे ठरवून परवानगी दिली. पुढे रघुनाथ नाशिकला दोन वर्षे राहिला. मात्र या वास्तव्या दरम्यान, मिळालेल्या मोकळेपणामुळे बहुदा, त्यांचे प्रेमसंबंध वेणू गव्हाणकरशी जुळल्याचे कळल्यावर व पुढले मॅट्रिकचे महत्वाचे वर्ष विचारात घेऊन त्याच्या वडिलांनी रघुनाथला सांगलीला पाठविले. (विशेष नोंद – रघुनाथ डहाणूमध्ये प्रत्येक आठवड्याच्या शेवटी बरेच मूकपट बघत असे. त्याचे सिनेमाचे ते वेड तेव्हापासूनचे म्हणजे मूकपटांच्या जमान्यापासूनचेच होते. पुढे नाशिकला ते फोटोग्राफी शिकले आणिनंतर मुंबईला आल्यावर बोलपटांचे ते जुने वेड परिपूर्ण झाले. तो अभ्यास नंतर चित्रपटनिर्मितीमधे त्यांच्या कामी आला.)

५) १९२४ ते १९२६ नाशिक येथे –  रघुनाथने नाशिक हायस्कूलमध्ये ( इयत्ता ९वी आणि १०वी) काका विठ्ठलरावांच्या घरी राहून केली. नाशिक हायस्कूलमधे त्यांना देशपांडे, कुलकर्णी (दोघेजण), शिंत्रे, कुकडे, मतकरी आणि बाबू पोतदार हे सर्व नवीन वर्गमित्र मिळाले. शिवाय विठ्ठलरावांच्या नाशिकच्या नव्या सामंतवाडीतील मित्र व तीन चुलत बंधू (बाळकृष्ण, रामभाऊ व हरीभाऊ) हेही होते. बाबू पोतदार यांच्या समवेत सामंतांनी नाशिक येथेही हस्तलिखित लिहिण्याची  सवय पुढे चालवली. येथे हस्तलिखिताचे नाव होते ‘विद्यार्थी’. भिडे प्राचार्य, नानासाहेब बर्वे, साने, नानिवडेकर आणि भाटे इत्यादी शिक्षक होते. त्यांच्या मित्रमंडळीच्या क्रिकेट टीम तयार होऊन सामने रंगत.नाशिकमधे रघुनाथचा  फोटोग्राफीचा छंद विकसित झाला.तो स्वतः डेव्हलपमेंट व प्रिंटिंग करायला शिकला. ते डार्करुमची सर्व कामे उत्तम करीत. त्यांनी नाशिकच्या गंगेवरच्या वातावरणात फोटोग्राफीचे बरेच प्रयोग केले. त्या काळात नवीनच येऊ घातलेले रंगीत छायाचित्रणही त्यांनी करून पाहिले. चुलतभाऊ बाळकृष्ण याचेसोबत त्यांनी चलत् छायाचित्रणही समजून घेतले (१९२५). ते दोघेही दादासाहेब फाळके यांनाही ओळखत. तेव्हा फाळके हे चित्रपटनिर्मितीपासून निवृत्त झालेले होते. नाशिकमधे रघुनाथ शास्त्रीय संगीतही शिकला. त्याचा आवाज चांगला होता. तो हार्मोनियमही वाजवायला शिकला. काही काळ, त्याला शास्त्रीय गायन-वादन शिकून मोठे गायक होण्याचीही गंभीरपणे इच्छा होती. या काळातच तो चांगल्या मराठी कविता आणि स्वत:ची गाणी संगीतबद्ध करण्यातही चांगला तरबेज झाला होता. नाशकात असा एकंदरीत त्याचा भरगच्च कार्यक्रम असे. कलात्मक अंगाने त्याची चांगली प्रगती होत होती. अभ्यासासह अन्य गायन-वादन, फोटोग्राफी, क्रिकेट इ. सारे काही तो आवर्जून करीत असे. ही वर्षे खऱ्या अर्थाने दूरगामी परिणाम करून गेली. मुख्यत्वे हे सारे घरातून बाहेर पडल्याने व मुक्त संचार करण्याची संधि मिळाल्याने करता आले. अशा मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.

नाशिक वास्तव्याचा नंतरच्या आयुष्यातील संबंध

 • अ) पुढे मुंबईत आल्यावर १९२७ नंतर (म्हणजे प्रीव्हियसच्या वर्षी ) एल्फिन्स्टनआणिआर.आय.एस. (इंटरसायन्सच्या वर्षी) या दोन महाविद्यालयातअसताना त्यांनी चित्रपटांचा दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून भरपूर अभ्यास केला व छायाचित्रणाविषयीही वाचन केले. फोटोग्राफीच्या छंदामुळे त्यांनी हॉलीवूडच्या इंग्रजी चित्रपटांच्या दिग्दर्शकांचे दिग्दर्शन-कौशल्य अभ्यासले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत असताना ते दर आठवडाअखेरीस ४-५ चित्रपट पाहून नंतर एकटे बसून त्यांचे मनन व विश्लेषण करीत. हा अभ्यास ते चित्रपट समीक्षण आणि दिग्दर्शनाच्या कोनातून करीत असत. त्या वेळी ते २० वर्षांहून कमी वयाचे होते.
 • ब) १९३८ नंतर त्यांचे स्वत:च्या व अन्य निवडक आवडत्या कवींच्या कवितांचे खासगी व ऑल इंडिया रेडिओ, मुंबईवर काव्यगायनाचे कार्यक्रम होत असत व ते खूप प्रसिद्ध होते.  १९३९-४० मधे सामंतांनी (तेव्हाचे वय २८-२९) स्वत:च्या काव्याच्या चार रेकॉर्डही एच.एम.व्ही. तर्फे जी. एन् जोशी यांचेसह प्रसिद्ध केल्या होत्या. त्या साऱ्या त्यांनीच संगीतबद्ध करून स्वतःच्या आवाजात गायिल्या होत्या. ती ‘आजचीगाणी’ मधील पलटणीचे सांघिकगीत, दर्याचे गीत व कोळ्याचे गीत अशा एकंदर चार ध्वनिमुद्रिका होत्या. त्या काळात ७८ आर.पी.एम. च्या बेकेलाइट ध्वनिमुद्रिका असत. यासंदर्भात पुढल्या काळात १९७०च्या सुमारास अमाप प्रसिद्धी प्राप्त झालेल्या कोळी गीतांची आठवण झाल्यावाचून रहात नाही. सामंतांच्या या चार ध्वनिमुद्रिका त्याआधी सुमारे तीस वर्षे ध्वनिमुद्रित केल्या गेल्या होत्या. त्या गाण्यांच्या सामंतानी बंधलेल्या चाली उपलब्ध आहेत. दुर्दैवाने त्या चार गाण्यांपैकीआज सांघिक गीताचे फक्त मूळ स्टुडिओतील एकमेव ध्वनिमुद्रण उपलब्ध होऊ शकले. ते डिजिटल सवरुपात ऐकता येते.
 • क) पुढे १९४१-४४ मध्ये त्यांनी मार्कंडेयाच्या कथेवर ‘चिरंजीव’ या चित्रपटाची निर्मिती त्यांचे चुलतबंधू  बाळकृष्ण यांचेसह केली. त्यात पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या विभागांची जबाबदारी सामंतांनी पार पाडली. त्या बोलपटातली सारी गाणीही सामंतांनीच लिहिली होती.  हे काम ते वयाच्या तिशीत असताना आणि चिकित्सक समूह  शाळेमध्ये शिकवत होते तेव्हाच ‘ज्योति चित्र’ या निर्मिति संस्थेकरिता  केले. दुर्दैवाने ‘चिरंजीव’ हा चित्रपट अपघातग्रस्त झाला! त्याच्या १६-१७ रील्सपैकी तीन अपघाताने नष्ट झाल्याने तो चित्रपट थिएटरमधे प्रसिद्धीलाच गेला नाही.सर्वांचे सारे श्रम व चुलतबंधूंचा पैसा फुकट गेला.
 • ड) आयुष्यातील नाशिकमधील त्यांची वर्षे सर्वात महत्वाचीआणि जडणघडणीची होती. तिथे ते मुक्त, कलात्मक व स्वतंत्र जीवन जगायला शिकले. आईविना पोरक्या मुलाची वयाच्या ६व्या वर्षापासून पुढील ७-८वर्षे होत असलेली कुचंबणा व मानसिक कोंडी भेदून ते त्यातून बाहेर पडले. याची जाणीव त्यांच्या वडिलांना बिलकुल नसावी असे वाटते. कारण त्यांची सावत्र आई फार हुशार मुत्सद्दी होती. सामंतांच्या कलात्मक कारकीर्दीचाआधार नाशिक येथेच तयार झाला. नाशिकला असताना केलेले सुरुवातीचे काही लिखाण पुढे प्रसिद्ध झाले व तेच त्यांचे प्रसिद्ध पावलेले पहिले लेखन असे दाखवता येते. त्याच सुरुवातीनंतर पुढे कॉलेजच्या काळापासून आणि नंतर पालघर-ठाणे-मुंबई इथल्या आयुष्यात एक साहित्यिक म्हणून ते आपले कर्तृत्व दाखवू शकले. त्यांना नाशिकमध्ये वेणू गव्हाणकर भेटली जी कालांतराने पुढे त्यांची जीवनसाथीही बनली आणि त्यांच्या साहित्यिक व अन्य सर्वच कारकीर्दीचा अविभाज्य भाग बनून तिने त्यांना साथ दिली. तिच्या मदतीशिवाय सामंत एक यशस्वी लेखकबनूच शकले नसते असे वाटते. त्यांच्या कर्तृत्वाला बहर यावा म्हणून तिने आपल्या कलागुणांना व कर्तृत्वाला मुरड घातली. वास्तविक ती अखिल भारतातील शास्त्रीय हिंदुस्तानी संगीतातील सर्वप्रथम महिला पदव्युत्तर पदवीधारक होती. १९५४-५५ पर्यंत ती शास्त्रीय संगीताची रेडिओ कलाकारही होती. तिलाही लेखन व काव्याचे अंग होते. ती संगीतशिक्षिका होती व तिने काही काळ ‘संगीतसाधनाधाम’ या नावाने संगीतशिक्षणाचे वर्गही दादर येथे चालविले होते. पण पुढे तिने संपूर्ण तडजोड करून घरातील सर्व जबाबदारीआणि चार मुलांचे शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या संगोपन करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. याचमुळे सामंत निश्चिंत मनाने आपल्या लेखनावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकले व इतक्या मोठ्या प्रमाणावर साहित्यसेवा करू शकले, हे खरेच. 

६) १९२६-२७ सांगली येथे – मॅट्रिकच्या वर्षासाठी रघुनाथच्या  वडिलांनी त्याला सांगली हायस्कूल येथे पाठविले. त्याच वेळी वडिलांची धुळे येथे बदली झाली. सामंत तेव्हा १७ वर्षांचे होते. असा अंदाज आहे की त्यांच्या वडिलांना  कुणकुण लागली असावी की नाशिकमधील वास्तव्यात त्याचे शेजारच्या  एका मुलीवर प्रेम जडले. हे प्रेम वडिलांच्या इच्छेविरुद्ध होते. म्हणूनच त्यांनी रघुनाथला नाशिकहून सांगली येथे हलविण्याचा निर्णय घेतला. रघुनाथला सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापकअसलेल्या श्री. ठाकूर(हे रघुनाथच्या सावत्र आईचे बंधू होते) यांच्या देखरेखीअंतर्गत सांगलीत ठेवले होते. १९२६-२७ च्या दिवाळीच्या सुट्टीत वडिलांच्या संमतीने रघुनाथ सातारा येथील पीरवाडीला गेले. तिथे त्यांच्या वडिलांचे आध्यात्मिक गुरु कोंडिबा महाराज असत. त्यांना ‘सावकार’ असे म्हणत. त्या सुट्टीत रघुनाथने सावकारांसमवेत मिरज, कोल्हापूरआणिदत्तवाडअसे ठिकठिकाणी दौरे केले आणि पिरवाडी येथेही वेळ घालवला. तेथे, रघुनाथने सावकारांचे काही ‘चमत्कार स्वतःसमोर घडताना अनुभवले. रघुनाथने सावकारांच्या ठायी अस्तित्वात असलेली ‘अलौकिक शक्ती अनुभवली. आयुष्यभर सामंत जवळजवळ एक ‘नास्तिक’ होते तरीही या अनुभवामुळे त्यांच्यावर कायमस्वरूपी एक छाप निर्माण झाली. कोंडीबामहाराज हे साधेसुधे अशिक्षित शेतकरी होते तरी ते रघुनाथ महाराज पुराणिक धोपेश्वरकर (काकामहाराज पुराणिक) यांचे शिष्य होते. काकामहाराज यांच्याच आशीर्वादाने रघुनाथ याचा जन्म भागीरथीच्या पोटी झाला असे कुटुंबात मानत असत, तसा जगन्नाथपंत व रघुनाथची आई भागीरथी यांचा मनोमन विश्वास होता. म्हणूनच त्यांनी मुलाचे नाव रघुनाथ असे ठेवले होते.  सावकारांनी रघुनाथला सांगितले की, “मी स्वत: चमत्कार वगैरे काहीच करीत नाही. मी  मनाने एक साधा निर्मळ माणूस आणि निरक्षर, कष्टकरी शेतकरी आहे.” त्यांच्यात ‘चमत्कार’ पहाणारे सर्व लोक त्यांच्याकडे स्वाभाविकपणे  येत कारण काकामहाराजांनी कोंडिबाला (एकाशेतकऱ्याला) आशीर्वाद दिला व शिष्य केले. “तेच (काकामहाराज) आपली दिव्य शक्ति वापरून माझ्यामार्फत काय करायचे ते करून घेतात.” नंतरच्या काळात, कोंडीबामहाराजांनी केलेल्या काही चमत्कारांचे वर्णन सामंत (आमचे भाई) मोठ्याच सुरसपणे करीत. कोंडीबामहाराजांशी त्यांचा विशेष संपर्क १९३३ नंतर फारसा उरला नव्हता. लवकरच रघुनाथ पूर्णपणे अलग झाला आणि पुढल्या काळात मुंबई–ठाण्यातील आपल्या सामान्य शहरी जीवनात पुढे जात राहिला. १९२७ ते १९३४ या काळात तो विद्यार्थी होता.

७) १९२७-१९३७ मुंबई-पुणे-मुंबई –  सामंत यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई व पुणे येथे झाले. वडिलांची इच्छा रघुनाथने एक डॉक्टर व्हावे अशी होती. पण ते डॉक्टर होऊ शकले नाहीत. शास्त्र शाखेत अकल्पितपणे अपयश रघुनाथ यांचा पिच्छा पुरवत राहिले. सायमन कमिशनने १९२७ मधे भारताला भेट दिली तेव्हा तरुण रघुनाथ यांचेवर गांधींच्या राजकीय विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांचे लक्ष विचलित झाले होते. वार्षिक परीक्षेवेळी भौतिकशास्त्राच्या (फिजिक्स) प्रयोगात अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांचे लक्ष भोवतीच्या राजकीय वातावरणाकडे वेधले गेल्यामुळे त्याला लागोपाठ दोन वर्षे अपयश आले. त्यामुळे पुण्याला जावे अशी कल्पना पुढे आली. त्याप्रमाणे ते पुण्यात फर्ग्युसनला दाखल झाले. अंतिम परीक्षेच्या वेळी त्यांचे भौतिकशास्त्र प्रयोग(मुंबईत) दोनदा अयशस्वी झाले तर पुण्यात प्रयोग उत्तम होऊनही  लेखी पेपरसमयी गोंधळून अर्धा वेळ काहीच सुचेनासे झाले व पुन्हा अपयशच पदरी पडले. त्यांनी वडिलांच्या इच्छेनुसार प्रथम एल्फिन्स्टनयेथे, त्यानंतरआरआयएस आणि नंतर फर्ग्युसन अशी महाविद्यालये बदलली व शास्त्र शाखेत डॉक्टर होण्याचे दृष्टीने प्रयत्न केले. प्रयोगशाळेत प्राणी चिरफाड करण्यात ते चांगलेच वाकबगारहोते. पण वडिलांच्या इच्छेनुसार डॉक्टर बनणे त्यांच्या नशिबी नव्हते. त्यानंतर निर्णय घेऊन त्यांनी पुण्यातच फर्ग्युसनमधून  पुढील  वर्षी (१९३१-३२) इंटरआर्ट्स् केले.  त्यापूर्वी  मुंबईत असतांना प्रसिद्ध होऊ लागलेले त्यांचे लिखाण पुढे पुण्यात असतानाही नियमितपणे प्रसिद्ध होतच होते. १९३२-३३ मधे ते  मुंबईत  परतले  व नंतर विल्सन आणि झेव्हियर्स कॉलेज येथून अखेरीस १९३४ मधे बी.ए. पूर्ण करण्यात यशस्वी झाले. अशा रीतीने वडिलांच्या आग्रहाखातर व त्यांच्या इच्छेला मान देण्याच्या  परिणामी त्यांची पदवी खूपच लांबली.

८) १९३४ मधे बी.ए. झाल्यावर त्यांनी एम.ए. करण्याचाही प्रयत्न १९३५ ते १९३७ दरम्यान केला. पुन्हा वडिलांच्या आग्रहाखातर कायद्यासाठीही नाव नोंदवले. त्यांचे बरेच मित्र एम.ए. झाल्यामुळे प्राध्यापकही झाले. पण एम.ए. होण्यातही सामंत अयशस्वी झाले. त्यांच्या नोटस् अभ्यासून  इतर  बरेच मित्र एम्.ए.  पास  झाले. कदाचित् सामंतही एम्.ए च्या परीक्षेत यशस्वी झाले असते तर त्यांच्या जीवनाचे वळणही  बदलले असते. कदाचित् त्यांचे वडिलांशी आधीच दुरावलेले संबंधअधिक दुरावले नसते. मात्र या साऱ्यात जमेची बाजू म्हणजे १९२९ते३२ या दरम्यान ते एक तरुण लेखक म्हणून नावारुपाला आले. त्यांच्या २३व्या जन्मदिनी त्यांचे पहिले पुस्तक ‘हृदय’ प्रसिद्ध झाले व ते ‘हृदयकर्ते’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे हे पुस्तक त्यांच्या स्वतःच्या पंचविशीआधीच मुंबई विद्यापीठाने एम्.ए. च्या अभ्यासक्रमात लावले तेव्हा ते स्वत: पदवीधरही नव्हते ही एक विशेष बाब नोंदवायला हवी. याव्यतिरिक्त जानेवारी १९३४ मधे त्यांचे ‘पारिजात’ हे मासिकही सुरू झाले. ते दुर्दैवाने अल्पजीवी ठरले तरीही मासिकांच्या क्षेत्रात ते एक अनोखा मापदंड निर्माण करून अस्तंगत झाले, अशी आठवण वाङ्मयीन क्षेत्रात आजही काढली जाते हे विशेष. एम्.ए. मधेही अपयश आल्यानंतर वडिलांच्या इच्छेविरुद्ध मे १९३७ मध्ये त्यांचे लग्न झाले. (त्याच मुलीसह जिच्या प्रेमात ते नाशिकमधे असताना पडले होते.) लग्न झाल्यावर लगेच ते कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये (एस् एम् टी टी येथे) बी.टी. करण्यासाठी गेले. १९३८ मध्ये त्यांनी बी.टी. पूर्ण केले. हृदय, सुरंगीची वेणी, वाळूतील पाऊले व उपकारीमाणसे अशी त्यांची पुस्तके एका मागोमाग एक प्रसिद्ध झाली व साहित्यिक म्हणून त्यांचे नाव कायम झाले. त्यानंतर लगेच ते शिक्षक म्हणून मुंबइत रुजू झाले. अशाप्रकारे आयुष्यातील त्यांची कारकीर्द  शिक्षक म्हणून (वडिलांच्या इच्छेविरुद्ध) स्थापित झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्नही केले. वडिलांसाठी नक्कीच ती एक मोठी निराशा होती. कारण, रघुनाथने बीए.पूर्ण झाल्यानंतर लॉ करून पुढे बॅरिस्टर व्हावे, निदान एक सन्माननीय सरकारी नोकरी  तरी स्वीकारावी अशी त्यांच्या वडिलांची खूप  इच्छा होती. वडिलांच्या उच्चपदस्थ असण्यामुळे व संपर्कांमुळे रघुनाथला ती मिळणेही काहीसे सोपे होते. पण रघुनाथ यांनी तेही नाकारले आणि (वडिलांच्या मदतीविना) शिक्षक होण्यासाठी बी.टी. करण्यासाठी ते कोल्हापुरात गेले होते. खरंतर, थोड्या काळासाठी, बी.ए. पूर्ण केल्यावर, गुरुदेव टागोरांच्या शांतीनिकेतन मध्ये जाण्याचाही त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार केला होता. बी.ए. होईपर्यंतच्या सात वर्षांत, तो अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी आपल्या शिक्षणात ते यश मिळवू शकलेनाहीत. त्यांना शैक्षणिक बाबतीत अपयशांमागेअपयशे पचवावी लागली. मात्र या साऱ्या दरम्यान वयाच्या अवघ्या १५व्या वर्षापासून त्यांनी जी लेखनकला विकसित केली होती आणि १९२९ पासून त्यांचे लिखाण नियमित प्रसिद्ध होऊ लागले होते तीच स्थायी झाली अणि ते तसेच पुढे ३५ वर्षे लिहीत राहिले.  

९) अंतिमतः ते एक नावाजलेले शब्दचित्रकार, कादंबरीकार व कोशकार म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या उमेदवारीच्या दिवसात (१५ते१८वय) सुरुवातीला गृहलक्ष्मी, विविधवृत्त, यशवंत इत्यादींसारख्या मासिकांतून लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर १९२९ मध्ये प्रगती मासिकात त्यांचे लेखन नियमितपणे येऊ लागले. ‘प्रगती’ हे तेव्हाच्या काळात मानले जाणारे आदरणीय नाव होते. मराठी साहित्यामधे ‘शब्दचित्र’ या नव्या प्रकाराच्या योगदानामुळे सामंत एक तरुण लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे पहिले पुस्तक त्यांच्या २३ व्या वाढदिवशी म्हणजे दि२४-१२-१९३२ रोजी प्रकाशित झाले. लवकरच, १९३४ मध्ये सामंतांनी ‘पारिजात’ हे मासिक वडिलांकडून पैसे घेऊन सुरू केले. मासिकाला मोठेच यश मिळालेआणि आजही त्याची आठवण ‘ मराठी मासिकांतला मैलाचादगड’ म्हणून काढली जाते. परंतु त्या मासिकामुळे सामंतांच्या वडिलांचे मोठेच आर्थिक नुकसान झाले. अशाप्रकारे, या काळात त्यांचे सर्व प्रयत्न आणि शक्ती विखुरल्या गेल्या. कोणत्याही एका क्षेत्रात त्यांना स्थिरता मिळू शकली नाही. शिक्षणात, पैशाच्या कमाईने किंवा वडिलांच्या दृष्टीनेही त्यांना ते प्रतिष्ठित स्थान मिळवता आले नाही. १९३७ मधे लग्न केल्यानंतर व पत्करलेल्या शिक्षकी पेशामुळे सामंतांच्या आयुष्यात कायमच अर्थिक संकट असे. ओढाताणीची अवस्था असे. मात्र एक उत्तम विद्यार्थीप्रिय शिक्षक व एक साहित्यिक म्हणून सामंतांनी त्यांच्या पहिल्या दीड-दोन दशकांत चांगले नाव मिळवले. तो एक सावत्र मुलगा होता त्याचा परिणाम मात्र त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर व कुटुंबावर झालेला आढळतो. या साऱ्या कालखंडात त्यांना त्याच्या काटकसरी व गृहकृत्यदक्ष सुविद्य पत्नीची साथ होती. 

१०) १९३७ सालात लग्न नंतरचा संसार – १९३४ मधे सेंट झेव्हियर्समधून पदवीधर होण्यापूर्वीच एक लेखक म्हणून व ‘शब्दचित्रकार’ आणि ‘हृदयकर्ता’ या विशेषणांनी सामंतांची प्रसिद्धी आधीच झालेली होती. वडिलांच्या इच्छेनुसार डॉक्टर होण्याच्या दिशेने केलेल्या सर्व प्रयत्नांमधे आलेल्या  पूर्ण अपयशामुळे त्यांना धक्का बसला असला, तरी लेखक म्हणून सामंतांची प्रगती सातत्याने सुरूच होती. अगदी सुरुवातीला १९२७ त आपल्या इच्छेनुसार  ते वेगवेगळ्या मासिकांना आपले लेखन पाठवत. काही मोजकेच प्रयत्न यशस्वी होत पण बरेचसे अयशस्वी होत.  मात्र नंतर १९२९ मध्ये जेव्हा त्यांच्या ‘सुभान्या’ ची प्रगतीमध्ये प्रकाशित करण्यासाठी संपादक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी निवड केली तेव्हा त्यांना खरीखुरी संधि मिळाली. एका पाठोपाठ एक असे अनेक लेख ‘प्रगती’मध्ये प्रकाशित झाले. १९२७-२८ मधे तरुण रघुनाथ यांनी सायमन कमिशनविरुद्ध ‘सायमन गो बॅक’  या राजकीय निदर्शनातही भाग घेतला होता. परंतु नंतर त्यांचे राजकीय आकर्षण लवकरच संपले. मुंबईत त्यांच्या  कॉलेजच्या काळात त्यांनी शास्त्रीय संगीताचे अधिक शिक्षण घेतले, हार्मोनियमवादनाचा छंदही जोपासला. यापूर्वी, सामंतांच्या वडिलांनी त्यांना शालेय शिक्षणाच्या काळात एक ऑर्गनही आणून दिला होता. त्यावरही ते खूप सराव करीत आणि संगीत विषयाच्या आवडीचा पाठपुरावा करीत असत. त्यांनी शास्त्रीय कंठ्य संगीतात चांगली प्रगती केली होती. थोड्या काळासाठी ते गंभीरपणे गायक होण्याचा विचारही करीत असत. कदाचित एक दिवस ते खरोखरच चांगले गायकही झाले असते. परंतु जसजसे त्यांचे लिखाण अधिक प्रसिद्ध व लोकप्रिय होत गेले व उत्तेजन मिळत गेले तसतसे त्यांचा त्याबाबतचा उत्साह मावळला. पुढे त्यांनी शास्त्रीय संगीत (गायन-वादन) पूर्णपणे सोडूनही दिले. मात्र ते ज्ञान त्यांना कामी आले व काव्यगायनआणि सांघिक गीतगायन हे विशेष आवडीचे विषय होते व ते तसेच कायम राहिले. तरुण रघुनाथ १९३०-३२ मधे ‘कुमार रघुवीर’ या नावाने लेखक म्हणून उदयास आले होते. नंतर केव्हा तरी १९३९ पासून पुढे ते रघुवीर सामंत याच नावाने लेखन करीत राहिले.

१९३२ नंतर आणखी थोडक्याच काळात १९३४ ते १९३८ या दरम्यानसुरंगीचीवेणी,वाळूतील पाऊले व मागोमाग उपकारी माणसे या कादंबरी मालिकेतील पहिले दोन खंड व आजची गाणी अशी पुस्तके क्रमाने थोड्याथोड्या काळाने प्रसिद्ध होत गेली. हा सामंतांच्या साहित्यिक प्रतिभेचा ऐन बहराचा काळ होता. त्या कालखंडानंतर कदाचित लेखनाबरोबरच अध्यापन, सिनेनिर्मिती, मुद्रण, पर्यटन असे अनेक  नवनवे उपक्रम हाती घेतल्यामळे ते लेखनाकडे शंभर टक्के अवधान देऊ शकले नसावेत. १९४५ नंतर त्यांच्या लेखनाचा ओघ काहीसा कमी होत गेला असे भासते. त्यांचे पहिले पुस्तक ‘हृदय’ २४-१२-१९३२ रोजी भारत गौरव ग्रंथमालेतून प्रकाशित झाले होते.. नंतरच्या थोड्या काळा त्यांनी त्या मालेचा व्यवस्थापक-संपादक म्हणूनही काम केले. हा त्यांच्यातील लेखकाचा निर्णायक जन्म होता. त्यातूनही त्यांच्या ओळखी साहित्य जगतात वाढल्या. त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी सुखाने लेखन व साहित्यसंबंध जपले जे त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध होते. लेखक म्हणून त्यांची अशा रीतिने पूर्ण स्थापना झाल्यानंतर त्यांनी चांगल्या संस्कृतीची आणि चांगल्या भाषेची जाण असणारे  वाचक निर्माण व्हावेत, चांगली अभिरुचि जोपासावी यासाठी आणि वाचकांना प्रोत्साहित करावे यासाठी पूर्णपणे समर्पित असे एक दर्जेदार मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लग्नापूर्वी सामंतांनी एम.ए. मिळवण्याचा प्रयत्नही केला होता पण तिथेही अयशस्वी झाले. त्यांचे वय वाढत होते आणि सामाजिक रुढींनुसार वयाच्या २७व्या वर्षी ते लग्नासाठी एक चांगला  उमेदवार होते. पण या बाबतही त्यांची आपल्या वडिलांशी मतभिन्नताच होती. रघुनाथने आपल्या इच्छेनुसार लग्न करावे अशी वडिलांची अपेक्षा होती तर रघुनाथ १६ वर्षांचे असताना नाशिक येथे जमलेले त्यांचे प्रेमसंबंध ते पूर्णत्वास नेऊ इच्छित होते. सामंत खूप वर्षांपासून आपल्या वडिलांच्या परवानगीची वाट पाहत होते. परवानगी मिळवूनच ते विवाहबद्ध होऊ इच्छित होते. सरतेशेवटी सामंतांच्या वडिलांना मे १९३७ मध्ये वेणू गव्हाणकर यांना आपली सून म्हणून स्वीकारावे लागले. त्या विवाहाला वडिलांनी नाइलाजानेच मान्यता दिली. परंतु लग्नानंतरही सासरच्यांनी वेणूला आपल्या कुटुंबात मोकळेपणाने सामावून घेतले नाही. रघुनाथांची सावत्र आई या लग्नाबद्दल फारशी उत्सुक नव्हतीच. तिकडून नवीन वधूला कोणतेही दागिने दिले नाहीत व नंतर कधी कुटुंबात तिला समाविष्टही केले नाही. त्यांच्या घराचे दरवाजे सुनेसाठी कायमचे अलिखितपणे बंद होते. इतके की ती व नंतर तिची मुले त्यांचेसाठी अस्तित्वातच नव्हती.

सामंतांचे साहित्यिक नाव ‘रघुवीर सामंत’ कसे झाले – सुरुवातीचे त्यांचे नामकरण ‘कुमार रघुवीर’ असे कुणी, कुठे व कधी केले याबद्दल काही अंदाज बांधता येतात. परंतु विश्वासार्ह माहिती अभावी ते तपशील इथे दिलेले नाहीत. ‘हृदय’ हे पुस्तक पूर्वी प्रसिद्ध झालेले बरेच लेख एकत्र करून निर्माण केले होते. ते लेख सामंतांनी कोणत्या नावाने लिहिले होते हे पहायला हवे. गृहलक्ष्मी, प्रगती व अन्य मासिकांचे अंक उपलब्ध असल्यास त्याचा शोध घेता येईल.  परंतु अपेक्षा अशी असायला हरकत नाही की ते नाव ‘कुमार रघुवीर’च असावे. ते खरे असेल तर असे म्हणता येईल की त्यांनी नाशकात असताना पहिले लिखाण करतेवेळीच ‘कुमार रघुवीर हे नाव धारण करण्याचे ठरविले होते. कारण त्या काळातील (१९२४-२५असावे.. किमान १९३२ पूर्वीचे ते आहेच कारण ते हृदय पूर्वीचे आहे) ) एक अप्रकाशित कथा त्या नावाने लिहिलेली आहे. मात्र पुढे असे दिसते की पहिले पुस्तक ‘हृदय’ हे “कुमार रघुवीर” या नावाने २४-१२-१९३२ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर वाळूतील पाऊले (२४-१२-१९३४) व सुरंगीची वेणी (२४-१२-१९३५)ही नंतरची दोन पुस्तकेही कुमाररघुवीर याच नावाने प्रसिद्ध झाली. एक २५ वर्षे व एक २६ वर्षे पूर्ण होताना. पंचवीस वर्षे उलटल्यावर कुणी कुमार रहात नसल्याने त्यांना तेच नाव वापरणे योग्य वाटले नसावे. या दृष्टिकोनातून ते १९३५ नंतर नवे कोणते नाव धारण करावे या विचारात ते होते असा कयास बांधता येऊ शकतो. यानंतर महाशिवरात्र १९३८ (मार्च१९३८) या दिवशी सामंतांनी ‘उपकारी माणसे’ या प्रदीर्घ कादंबरी मालिकेपैकी दोन खंड (प्रवासातले सोबती व अभ्रपटल) प्रसिद्ध केले ते मात्र ‘रघुनाथ ज. सामंत’ या नावाने. त्यानंतर प्रसिद्ध केलेली (१९३९ पासून पुढील) सारी पुस्तके ‘रघुवीर सामंत’ या नावाने प्रसिद्ध केली. तर हा त्यांच्या साहित्यिक नावाचा प्रवास दिसतो. वयाची पंचविशी उलटल्यावरही आपले नाव ‘कुमार रघुवीर’ असेच रहावे हे त्यांना प्रशस्त वाटले नसावे. तसेच ‘रघुनाथ ज.  सामंत’ या कौटुंबिक, व्यवहारातील नावाने लेखन करावे असेही त्यांना वाटले नाही. त्यामुळे त्यांनी ‘रघुवीरसामंत’ हे नाव १९३९ सालापासून पुढे प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांसाठी धारण केलेले दिसते. या संदर्भात ‘कुमार’चा  ‘रघुनाथ’ न होता ‘रघुवीर’ का व कसा झाला हे विशद करणारे एक पत्र (केव्हा तरी १९४८सालातील असावे) त्यांचे एक स्नेही, चिकित्सक शाळेतील इंग्रजीचे सहशिक्षक (पुढे ते सिद्धार्थ कॉलेजात प्राध्यापक झाले) यांचे उपलब्ध आहे. फार खेळकर भाषेत लिहिलेले ते इंग्रजीतील पत्र फारच वाचनीय आहे.

१९३७ नंतरचा सामंतांचा संसार रघुनाथ आणि त्यांची पत्नी स्नेहल (पूर्वाश्रमीची वेणू गव्हाणकर) यांच्या घरात जन्मलेल्या कोणत्याही मुलांना (मुलगी किंवा मुलगा) त्यांच्या मूळ  घरातून कोणत्याही वेळी आमंत्रित केले गेले नाही किंवा काही दागिने वा भेटवस्तूही दिली गेली नाही. वास्तविक कोणत्याही कुटुंबात ही गोष्ट अत्यंत सामान्य आहे. त्यात रघुनाथ हा त्यांच्या वडिलांचा मोठा मुलगाही होता. खरं तर आपल्या कुटुंबात मोठ्या मुलाकडे एक नातू जन्मणे हाच एक मोठा उत्सव असतो. त्यातून सामंतांच्या कुटुंबात अन्य कुणी नातू नव्हता. रघुनाथचे वडिलांच्या घरात जाणे-येणे असले तरी लग्नानंतर त्याचे तिथे विशेष आगत-स्वागतही होत नसे. तसेच खाण्या-पिण्यात उघड उघड दिसतील असे भेदभावही सामंत व त्यांच्या पत्नीला अनुभवाला येत असत. नातवंडांना आजी-आजोबा हे नाते कसे असते हेही ठाऊक नव्हते. त्यामुळे आपोआपच सामंतांचे ठाण्याला जाणे-येणेच कमी झाले. अशा प्रकारे सामंत व त्यांचे वडीलआणि अन्य कुटुंबीय एकमेकांपासून मनाने कायमचे फार फार दूर गेले होते. लग्नानंतर लगेचच रघुनाथने काही काळ गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन येथे जाण्याची इच्छाही बाळगली. पण सरतेशेवटी कोल्हापूर येथील बी.टी. कॉलेज (एसएमटीटी) येथे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि नंतर करिअरच्या सुरुवातीला त्यांचे वडील जगन्नाथ जसे (आर्यनसंस्थेत) शिक्षक होते तसेच एक शिक्षक झाले. यातील फरक असा होता की त्यांचे वडील त्या संस्थेत काही थोडक्या काळाकरिता व्हाइस प्रिन्सिपल व  संस्थेचे क्रियाशील सदस्य म्हणून (२-३ वर्षे काम करून) नंतर पुढे न्यायाधीश बनले तर रघुनाथ आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून आयुष्याच्या शेवटापर्यंत कायमचे शिक्षकआणि जोडीने साहित्यिकच राहिले. पण त्यांना यात काही कमीपणा वाटण्यासारखे जाणवत नव्हते.

मात्र जगन्नाथपंतांना आपला मुलगा सुरुवातीला डॉक्टर व्हावा किंवा नंतर (बीए झाल्यावर त्यांच्याप्रमाणेच एल्एल्बी करून) बॅरिस्टर व्हावा किंवा गेला बाजार निदान एखादा प्रतिष्ठित सरकारी ऑफिसर तरी व्हावा आणि त्याने लग्नासाठी मी निवडलेले माझ्या पसंतीचे स्थळ मान्य करावे असे वाटत होते. या साऱ्या अपेक्षा एक पिता म्हणून त्यांच्या दृष्टीने व समाजातल्या त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशाच होत्या हे खरेच पण रघुनाथ मात्र यातले काहीच सत्यात उतरवू शकला नाही. तो स्वतःच्या स्वतंत्र प्रयत्नांवर विश्वासला.            

एका संक्षेपात, १९३२ अखेरीस ‘हृदय’मुळे त्यांची ओळख “शब्दचित्रकार” अशी झाली. नंतर १९३४-३५ च्या दरम्यान रघुनाथ यांनी केवळ दीड वर्षासाठी पारिजात हे मासिक चालवले. त्यात वडिलांसाठी मोठे नुकसान नोंदवून ते बंद केले, नंतर एम.ए. करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान त्याची आणखीही काही पुस्तकेनिघाली. ‘वाळूतील पाउले’ प्रकाशित करून त्यांनी आपले स्वतःचे ‘पारिजात प्रकाशन’ सुरू केले. वेणू गव्हाणकर हिच्याशी लग्न केले. बी.टी. करण्यासाठी ते कोल्हापुरात गेले आणि परतल्यावर गिरगाव, मुंबई येथील तत्कालिन प्रसिद्ध अशा चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिक्षकपद घेऊन त्यांनी आपल्या अध्यापनपेशात प्रवेश केला. १९३८-३९ मधे तीन खंडांतील ‘उपकारी माणसे’ ही कादंबरी मालिका लिहून त्यांनी एक “कादंबरीकार” म्हणूनही आणखी विशेषण प्राप्त करून स्वत:ला स्थापित केले. १९४० मधे ते फक्त ३१ वर्षांचे होते व लवकरच ‘चिरंजीव’ चित्रपटाची निर्मिति हाती घेण्याचे विचार त्यांच्या व चुलतबंधु बाबुराव सामंत या दोघांच्या मनात घोळत होते. त्यांना कोणत्याहि परिस्थितीत आपल्या वडिलांच्या मदतीची कुबडी नको होती. त्यांना वडिलांच्या आधाराने आपल्या जीवनात उभे रहायचे नव्हते. अशा रीतीने १९४० मधे त्यांच्या जीवनाचा आलेख एका जगावेगळ्या संमिश्र पद्धतीने परंतु सुस्थापित झाला होता.

११) १९३९–१९४९ मुंबई  शिक्षक म्हणून मिळवलेले यश – आतापर्यंतच्या आयुष्यात सामंतांनी घेतलेल्या निर्णयांच्या जोरावर तोपर्यंत ते मोठ्या प्रमाणात यशस्वी लेखक झाले होते. १९३९-४० पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय शिक्षकही बनले. विद्यार्थ्यांना मराठी भाषेत रस निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. त्यांना एक लेखकच आपल्याला मराठी शिकवतो आहे याचे फार अप्रूप असे. विशेषतः ‘अप्पांची बैलांची जोडी’ या धड्याबद्दल व काव्य शिकविताना स्वतः वर्गात गाऊन शिकविलेल्या कवितांबद्दल. साहित्य, कविता, गायन निबंध लेखन इत्यादी मधे किमान काही विद्यार्थ्यांमध्ये ते रस निर्माण करू शकले आणि त्यातीलच काही विशिष्ट विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात स्वत:च्या मार्गाने प्रख्यात लेखकही झाले. २४-१२-१९८७ रोजी ‘भेटेन पुन्हा’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने लेखकआणि शिक्षक म्हणून सामंतांविषयी बोलत असताना ‘चिकित्सक’मधील त्यांचे एकेकाळचे सह शिक्षक प्रा.  टी. ए. कामत यांनी हे निदर्शनास आणून दिले. त्यांचे काही आवडते विद्यार्थी पुढे आघाडीचे साहित्यिक झाले व त्यांच्या जडणघडणीत एक शिक्षक म्हणून सामंतांचा अदृष्य हात दिसतो असे त्यांनीआवर्जून नजरेला आणून दिले प्रतिपादन केले. १९३४ मधे पदवी घेतल्यानंतर, एम.ए.उत्तीर्ण होण्यात अयशस्वी झाल्यानंतर, ‘शांतीनिकेतन’ येथे जाण्याची योजनाआखून ती रद्द करून बी.टी. साठी जाणे त्यंनी निवडले. निवृत्त वडिलांच्या सूचनेनुसार ओळखीने सहजपणे उपलब्ध असलेली कोणतीही सरकारी नोकरी स्वीकारण्यास नकार देऊन ते स्वखुशीने शिक्षक झाले, आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध, त्यांनी अशा एका मुलीशी लग्न केले जिला लेखनात गती होती आणि जी संगीत अभ्यासक होती. मराठी भाषेच्या साहित्यिक जगतात स्वत:साठी एक विशेष स्थान त्यांनी निर्माण केले. बी.टी. पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत चांगल्या नावाजलेल्या शाळेत दाखल झाले आणि पुढील बारा वर्षे त्यांनी तिथे अध्यापन केले. शिवाय साहित्यिक योगदानाचे कार्य तसेच सुरू ठेवून ते खूप विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. त्यांच्या अनेक चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्यासाठी रुची निर्माण झाली व त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्यांमधून काही विद्यार्थी लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्रांमध्ये यशस्वी पत्रकारही बनले. काही विद्यार्थी पुढच्या पिढीतील आघाडीचे साहित्यिकही झाले. ते विद्यार्थीदशेत असताना त्यांना सामंत सरांनी दिलेले प्रोत्साहन पुष्कळांना पुढे घेऊन जाणारे ठरले. काहींना ते व्यक्त करण्यातही अजिबात संकोच वाटला नाही. त्यांच्या त्या काळातील अशा विद्यार्थ्यांत प्रामुख्याने जयवंत दळवी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, रवीन्द्र पिंगे, मनोहर देवधर, सदानंद पालेकर, महाबळेश्वर नाडकर्णी, द. य. राजाध्यक्ष यशवंत देव अशी काही नावे सांगता येतात. विजय तेंडुलकरही त्यांचेपैकीच एक समकालीन विद्यार्थ्यातील होते अशी एक आठवण ज्ञानेश्वर नाडकर्णी यानी सामंतसरांची आठवण म्हणून लिहिलेल्या त्यांच्या लेखात लिहून ठेवली आहे.      

विजय तेंडुलकरांनी ते स्वतः चिकित्सक शाळेचे किंवा सामंतसरांचे विद्यार्थी असल्याचे कुठे सांगितल्याचे ऐकण्यातआले नाही. मात्र त्यांचे वडील पुण्याला जाण्यापूर्वी मुंबईत स्थाईक होते त्या काळात ते चिकित्सकचे विद्यार्थी होते असावेत. सामंतांचे झेविअर्समधून बी.ए. होत असतानाचे वर्ग मित्र बा.द.सातोस्कर व प्र. शां.वर्टी होते. बी.ए. नंतरही खूप वर्षे या तिघांचे घनिष्ट मैत्रीसंबंध होते. श्री. वर्टी हे बी.ए. नंतर लॉंगमन्स ग्रीन या प्रकाशन संस्थेत काम करीत. बहुदा तेथेच धोंडोपंत तेंडुलकरही (छोट्या विजयचे वडील) काम करीत. सामंतांची व बाबा तेंडुलकरांची मैत्री या संपर्कातून जुळली की ३७-३८ मध्ये सामंत बी.टी.करिता कोल्हापुरात असताना त्यांची भेट झाली व (वयात मोठा फरक असूनही) मैत्री जुळली हे समजायला मार्ग नाही. मात्र १९३८ नंतर सामंत मुंबईत चिकित्सकमधे शिकवू लागल्यावर त्यांचे एकमेकांकडे बरेच जाणेयेणे असे. तेव्हा त्यांच्या या स्नेह्याचा ११-१२वर्षांचा लहान मुलगा (विजय) तिथेअसे अशी आठवण सामंत सांगत. पुढे ते कुटुंब पुण्याला गेले. विजय त्यांच्याबरोबर एक-दोन वर्षे चिकित्सकमधे विद्यार्थी होता असे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी लेखात लिहिले आहे. त्याच काळात १९४०मधे सुरू केलेल्या ‘ज्योति’ मासिकात सामंतांनी रघुनाथ तेंडुलकर (विजयचा मोठा भाऊ) हाअत्यंत हुशार, होतकरू तरुण मुलगा आपला सहसंपादक म्हणून निवडला होता. मात्र पुढे लवकरच तो व्यसनाधीन झाला आणि त्याचा अकाली दुःखद अंतही झाला. त्याचे सामंतांना मोठेच शल्य होते. विशेष म्हणजे त्याचेही नाव रघुनाथ असल्याने त्यांना विशेष आपुलकी होती. विषय निघाला तर ते त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत. त्यानंतर किंवा आसपास धोंडोपंतांनी मुंबई सोडली व ते पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे सामंतांचे व त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध संपले.                                                                                                                                                            

१२) १९४९–१९५५ सांसारिक अडचणी – चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये १२ वर्षे अध्यापन केल्यानंतर, सामंतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर,आता आपण आणखी काही नवे आपल्या पसंतीचे दीर्घकालीन स्वरूपाचे करून पहावे असे वाटले. तसेही त्यांची उपक्रमशील वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.  त्यांचे काही सहशिक्षक चिकित्सक शाळा सोडून गेले होते. तिथेच शिकवीत रहाणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. वडिलांचे निधन १९४७च्या एप्रिलात झाले. वडिलांनी सावत्रपणाच्या वातावरणात जरी त्यांच्या स्वकष्टानेअर्जित केलेल्या मिळकती मधे, रघुनाथवर अन्याय करणारा असमान हिस्सा दिला होता तरी तो गोड मानून सामंतांनी स्वीकारला. त्यांनी आपल्या लेखनाला पूरकअसा छापखाना (प्रिंटिंग प्रेस) भागीदारीत स्थापित केला. परंतु ती सुरुवातीपासूनच फसवणूक ठरली. या पार्श्वभूमीवर तसेच मध्यमवर्गीय लोकांच्या काटकसरीच्या पर्यटनाची गरज लक्षात घेऊन त्यांनी १९४९ मध्ये हिल स्टेशन खंडाळा येथे लॉजिंग-बोर्डींगची स्थापना केलीआणि सुमारे साडेचार-पाच वर्षे ते चालवले. पण सरतेशेवटी, त्यांच्या ‘पारिजात’ मासिकाप्रमाणेच हा प्रयोगहीअल्पजीवी व अपयशी ठरला आणि पदरी अपेक्षाभंग आला. अशा वेगवेगळ्या आर्थिक उलाढालीत त्यांचे वेळोवेळी बरेच नुकसान झाले. खरं तर ‘घरकुल केंद्रा’च्या यशस्वी संचालनातून  पुढे १९५०-५२ मध्ये, खंडाळा–लोणावळा भागात निवासी शाळा सुरू  करावीअशी त्यांची कल्पना होती. तसे प्रयत्नही त्यांनी केले. परंतु त्यात फारसे यश आले नाही व गती घेता आली नाही. अखेरीस त्यांना बराच तोटा सहन करावा लागला. वडिलांकडून मिळालेली सर्व स्थावर मालमत्ता बँकेकडे तारणही ठेवावी लागली. त्यांच्या पत्नीचे सर्व दागिनेही या साऱ्या प्रक्रियेत विकावे लागले. तिने मात्र जराही तक्रार केली नाही. संसार सांभाळण्यासाठी येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास त्यांच्या सुविद्य पत्नीने मनःपूर्वक साथ दिली. ती डगमगली नाही. तिच्या सहकार्याखेरीज पुढील कालखंड पारकरणे व आपले लेखनही सुरू ठेवणे सामंताना अशक्य झाले असते. तिने मोठ्याच कौशल्यपूर्वक व काटकसरीने संसार सांभाळला. सामंतांनीही परत अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन त्यांचा संघर्ष सुरूच ठेवला. मात्र हे सारे घडत असताना सामंतांनी वडिलार्जित स्थावर मालमत्ता जपूनठेवली व पुढील पिढीकडे  सुरक्षित पोचवली. लेखन, प्रकाशनाचे काम करताना त्यांनी ते जपले हे त्यांचे कौटुंबिक कर्तृत्व नजरेआड करता येत नाही.

१३) १९५५–१९६५ कारकीर्दीचाशेवट एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि एक विविध वाङमयप्रकारात सहजतेने लेखन करणारा साहित्यिक म्हणून आपली कारकीर्द आता लवकरच संपुष्टात येणार आहे याची जाणीव त्यांना या काळात  शेवटी शेवटी झाली. या कालखंडाच्या सुरुवातीस नुकतीच एक नवीन जात ‘कोचिंग क्लासेस’ म्हणून अस्तित्वात आली  होती आणि आपले बस्तान बसवू लागली. “तुम्ही इंग्रजी व मराठी भाषेसाठी नेतृत्व घ्या, आपण कोचिंग वर्ग सुरू करू ”, असे प्रस्ताव घेऊन काही मेहनती, प्रयोगशील, नव्या जमान्याच्या व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. ते नामांकित शिक्षक होते व त्यांच्या नावाचा उपयोग जरूर झाला असता. कोणीही अशा संधीचा अधिकात अधिक फायदा उठविला असता (विशेषत: आर्थिक परिस्थिती दोलायमान असताना) पण “मला भेसळयुक्त शिक्षण विकायचं नाही” किंवा “ मी ‘पाणी घालून पातळ केलेले दूध’ विकत नाही” असे म्हणत त्यांनी अशा सर्व प्रस्तावांना ठामपणे नकार दिला. ते खाजगी शिकवण्याही कधी घेत नसत. वास्तविक त्यांना पूरक उत्पन्नाची नितांत गरज नेहेमीच असे. पण त्यांना स्वतःच्याच नजरेत अधःपतन नको असे. त्यांना आपलेच मापदंड आग्रहीपणे जपायचे असत.            

ते शारदाश्रम विद्यामंदिर शाळा सोडून बाहेर आल्यावर तर त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला होता. आय.ई.एस.स्कूलच्या ( त्या कालची किंग जॉर्ज हायस्कूल) व्यवस्थापनात असलेल्यांपैकी त्या काळातले काही प्रतिष्ठित (त्यांच्यामधे संस्थेतले बेंबाळकर, कालेलकर व अन्य काही शिक्षक) मंडळींनी एकत्रितपणे येऊन सामंतांना इंडीयन एज्यु. सोसायटी मध्ये सामील व्हावे असे निमंत्रण १९५६मधे सामंतांकडे घरी येऊन दिले होते. त्यांना न दुखावता त्यांनी नम्रपणे तसे करण्यास नकार दिला. अशा रीतिने १९३८ पासून ते १९६२ पर्यंत टिकलेल्या त्यांच्या अध्यापन सेवाकालातच  त्यांनी आपले लेखन सुरूच ठेवले व ठराविक अंतराने मराठी साहित्यातल्या विविध प्रकारातील पुस्तके प्रसिदध केली. त्यांनी विविध प्रकारांतर्गत विपुल लिखाण केले. जवळजवळ पस्तीस वर्षे मराठी साहित्यात मोलाची भर घातली.  १९६५ नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने निवृती घेतली. लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९२९ पासूनच व विशेषतः १९३२ मधे ’हृदय’ प्रसिद्ध झाल्यावर, त्यांचे नाव बरेच चर्चेत आले. त्यांना प्रसिद्धी व मान्यताही मिळाली. बडोदे (१९३३) व नागपूर (१९३४) या साहित्य संमेलनांना त्यांची हजेरी तरुण साहित्यिक व ‘हृदयकर्ता’ म्हणून नजरेत भरली नंतर ‘पारिजात’मुळे ते लोकांमध्ये तसेच साहित्यिक वर्तुळात अधिकच प्रसिद्ध झाले. १९३२ नंतरच्या १२-१५ वर्षांत त्र्यं. शं. शेजवलकर, वा. म. जोशी, न. चिं. केळकर, य.गो. जोशी,मा. त्रिं. पटवर्धन  (माधव ज्युलियन), मामा वरेरकर, खंडेराव दौंडकर, डॉ. भालेराव, वि. स. खांडेकर, प्र.के. अत्रे,ग. ल. ठोकळ,ग. त्र्यं. माडखोलकर,वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), वा. गो. मायदेव, चंद्रशेखर, वि. ल. बरवे, बा. भ. बोरकर, सोपानदेव चौधरी, मा. दा. आळतेकर या आणि अशा अनेक तत्कालीन प्रतिष्ठित व नावाजलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, बडोदे, नाशिक, गोवा इ. अनेक ठिकाणच्या, वयाने – मानाने वरिष्ठ वा समवयस्क साहित्यिकांशी त्यांची जवळून ओळख झाली होती. ती बहुदा त्यांच्या ‘पारिजात’मुळेच व संमेलनांतील हजेरीने असावी. काहींशी ती  नुसतीच तोंडओळख नव्हती तर अधिक मैत्रीपूर्ण संबंधही होते. काहींशी त्यांचा पत्रसंवादही असे. १९३४ मधे पारिजात मासिकाचा खूप बोलबाला झाला. पण पुढे हे सारे लयालाही गेले. त्यानंतरच्या काळात  ‘ग्रुपिझम’चे काही कडवट अनुभव घेतल्यानंतर, त्यापासून बोध घेऊन त्यांनी त्यांची वाट कायमच वेगळी केली नि एकांडी शिलेदारी पत्करली. १९३४ सालच्या नागपूर संमेलनादरम्यान दादा मोहोनींनी फार सुरुवातीला खासगीत दिलेला सल्ला त्यांना पुढे पटला व त्यांनी तो पुढे कायमच अनुसरला. ते सर्वच लेखकांपासून अकारण बऱ्यापैकी दूर राहू लागले व संपर्क कमी करत गेले. साऱ्यांनाच अशा तर्हेने एकाच तराजूत तोलणे चूक होते. पण आपणही कदाचित दुसऱ्या कुणाला नकळत दुखावू असे त्यांना वाटे. ‘मी अलिप्तच बरा’ हा दृष्टिकोन असे. पण लोकांचा समज वेगळाच होई. त्यांना ते ‘माणूसघाणे’ भासत. मात्र याला अपवाद काही मोजकेच लेखक व जवळपास सारेच जुने-नवे विद्यार्थी असत. हेही खरे की आलेल्या अनुभवांनी ते काहीसे ‘कडवट’ झाले होते असे वाटते. मात्र आलेले वाईट अनुभव त्यांनी स्वतः कधी कथन केल्याचे स्मरत नाही.  कुणाही नव्या माणसांच्या ते फार जवळ जात नसत.

१९५८-५९ च्या सुमारास त्यांचे एके काळचे (चिकित्सकमधील) विद्यार्थी (नंतरचे स्नेही) श्री. के. आर. सामंत (माधव सामंत) यांच्या दादरच्या बुक सेंटर येथे त्यांचे बऱ्याचदा जाणे येणे असे (मी देखील तिथे जात येत असे.) कधी बरोबर तर कधी निरोप चिठ्ठी घेऊन). तिथे परदेशची सर्व तऱ्हेची शास्त्रीय (इंजिनिअरिंग, मेडिकल इ) व वाङ्मय विषयक पुस्तके आयात झालेली येत असत. त्या पुस्तकांचा निर्मिति-दर्जा, कागद व छपाई इ. सारे काही दृष्ट लागावी इतके छान असे. त्यावर त्यांच्यात चर्चाही होत. आपल्या मराठीमधे अशी दर्जेदार पुस्तके कधी उपलब्ध होतील याविषयी खंत असे. त्यानंतर काही अवधीत ‘भारतीय ग्रंथ भवन’ ची स्थापना झाली. तेव्हा नियोजित बालवाङ्मय मालिका, अमर विश्व साहित्य (मास्टर पीसेस ऑफ वर्ल्ड लिटरेचर) व मुलांचा ज्ञानकोश अशी प्रकाशने भारतीय ग्रंथ भवनने हाती घेण्याचे दृष्टीने प्रकल्प आराखडा सामंतांनी बनवून सादर केला. बरोबरीनेच, १९३२ सालातल्या ‘हृदय’चे पुनर्मुद्रणही हाती घेण्याचे ठरले. मात्र तेवढ्यातच ‘ज्ञान पारिजात’च्या योजनेला भारत सरकारची अग्रिम मदत मिळाली व पुढील ३-४ वर्षांत मुलांच्या ज्ञानकोशाचे (ज्ञान पारिजातचे) दोन खंड प्रकाशित होऊ शकले. भारतीय ग्रंथ भवन’ने प्रकाशित केलेल्या ‘अमर विश्व साहित्य’ या मालिकेच्या पहिल्या दोन भागांपुरता सामंतांचा सहभाग होता.थोडक्यात या साऱ्या ७-८ वर्षाच्या काळात ‘भारतीय ग्रंथ भवन’ करिताचे नियोजन, ‘अमर विश्व साहित्य’च्या निर्मितीची आखणी, भारत सरकारने दिलेल्या मदतीचा वापर करून लिहून प्रकाशित केलेले ज्ञान पारिजातचे पहिले दोन खंड व हस्तलिखित तयार झालेला तृतीय खंड या साऱ्यासाठी दिलेला वेळ, घेतलेले श्रम व वापरलेले डोके यामुळे पूर्ण व्यग्रतेत घालविल्याने सामंत अन्य ‘क्रिएटिव्ह’ स्वरूपाचे डोक्यात असलेले व योजलेले लिखाण कागदावर उतरवून प्रसिद्ध करू शकले नाहीत असे नमूद करावेसे वाटते. माणूस एकाचवेळी किती कामे करील याला मर्यादा या असतातच.

१९६० मधे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सरकारद्वारे सर्व साहित्यिकांना स्वतःची चागली घरे असावीत या हेतुने त्यांच्या स.गृ.नि.संस्थेसाठी जमीन दिली. पण ‘साहित्य सहवास’ मधील घरासाठी सामंतांनी अर्जही केला नाही. तसा अर्ज त्यंनी का केला नाही याचेही कळेल असे स्पष्टिकरण त्यांनी कधी दिले नाही. आयुष्यात ते फक्त दोन किंवा तीन साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले. एक नागपूर येथील  १९३३चे , दुसरे बडोदे १९३४चे व आणखी एक असावे, नक्की ठाऊक नाही. सुमारे साडेतीन दशकांच्या दीर्घकाळामध्ये त्यांनी मराठी साहित्यात सुमारे पन्नास पुस्तके लिहून स्वतःच प्रकाशित केलीआणि विकलीही. त्यांनी भाषांतरांची काही ठळक कामेही केली आणि इतर प्रकाशकांसाठीही काही मोजकी पुस्तके लिहिली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीत शालेय विद्यार्थ्यासाठी बालज्ञानकोश किंवा विज्ञानकोश उपलब्ध नाही ही बाब त्यांना साधारण १९५५-५६ पासूनच विशेष खटकत होती. त्यामुळे सातपाटी शाळेहून मुंबईला परतल्या नंतरच्या काळात त्यांच्यातला शिक्षक वैचारिक पातळीवर त्यांना स्वस्थ बसू देईना. या विषयावर त्यांचे कागदावरचे बरेचसे नियोजन व मनन सुरू होते. परंतु हा विषय समोर असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकारच्या लेखनाकडे त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकत नव्हते. १९५७ ते ५९ या काळात त्यानी आपले (उषःकाल, वसुधा अशा मासिकांतील)पूर्व प्रसिद्ध लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. तशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली. परंतु कोणतेही ठळक व मोठे लेखन केले नाही. मात्र १९५४ नंतरची त्यांच्या नियोजित लेखनासाठी केलेली काही टिपणे आढळतात. असे दिसते की बालज्ञानकोशाचा विषय कायमच समोर असल्याने त्यांच्या हातून इतर काहीही महत्वाचे लिखाण झाले नाही. मात्र काही नव्या आगामी कादंबरी लेखन विषयक टिपणे-उल्लेख आढळतात.त्यांच्या मृत्यूनंतर १९८७ मधे मॅजस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली “भेटेन पुन्हा” ही त्यांच्या हातून १९५०-५२ दरम्यान लिहून हातावेगळे झालेले हस्तलिखित सुमारे पस्तीसवर्षे इतके दीर्घकाळ बाजूला अडगळीत पडून होते यावरून नीट कल्पना यावी.

दरम्यान जुन्या ओळखीतले वरिष्ठ इहलोक सोडून गेले होते व समवयस्क बहुतेक साऱ्यांचे मैत्रीसंबंध नीटसे शिल्लक राहिले नव्हते. “आता कुणाची मैत्री उरली नाही हेच बरे!” असे ते म्हणत. अशा जुन्या संबंधांबाबत ते काहीच बोलत नसत. मात्र पारिजात मासिक बंद करतेवेळच्या घटनांबद्दल तसेच संपूर्ण तयार झालेला चिरंजीव रिलीज होऊ शकला नाही याबद्दल कधीतरी ओझरते उल्लेख त्याचे तोंडी येत. पण ते तेवढ्यापुरतेच व अर्धवट व कळण्यासारखे नसत. वा. रा. ढवळे व वा. ल. कुलकर्णी या एकेकाळच्या पारिजात मधील सहकाऱ्यांचा विषय निघाला तर ते तपशील सांगायचे टाळीत पण त्यांचेबद्दल चेष्टेच्या सुरात “फारच मोठे आहेत रे ते लोक” असे सांगत. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रासाठीच्या टिपणांमधे आलेल्या विविध अनुभवाची नोंद त्यांनी करून ठेवली असावी. ते सारे अनुभव व प्रसंग जर ते प्रत्यक्षात उतरले असते तर वाचायला मिळाले असते. तथापि त्यांनी मागे सोडलेल्य ध्वनिमुद्रित टेपांमधे ते आढळू शकेल. तेही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लवकर करू शकू असा विश्वास वाटतो.

सामंतांच्या संपूर्ण वाङ्मयीन कर्तृत्वाचा आढावा – त्यांची विविध साहित्य प्रकारांनुसार सुमारे ५० हून अधिक शीर्षकेआहेत. त्यांमध्ये शब्दचित्र, कादंबऱ्या, लघुनिबंध, लघुकथा, सांघिक गीते, इतर कविता,  बालवाङ्मय, मुलांची हावभावगीते आणि मुलांचा ज्ञानकोश यांचा समावेशआहे. यातील बव्हंशी त्यांनी ‘पारिजात प्रकाशन’ व ‘अमर ज्योति वाङमय’ अंतर्गत प्रकाशित केली असली तरी सुरुवातीची दोन व नंतरची जवळपास बारा पुस्तके अन्य प्रकाशकांनी प्रसिद्ध केली. तसेच ‘पारिजात प्रकाशना’ तर्फे त्यांनी आपल्या दोन मित्रांची पुस्तकेही १९४८ पूर्वी प्रसिद्ध केली. एकत्रितपणे त्यांचे स्वतःचे साहित्य सुमारे ६५०० ते ७००० मुद्रित पृष्ठे इतके असावे. मुंबईतील पांच आणि मुंबईबाहेरील एक अशा एकंदर सहा शाळांमधे त्यांनी अध्यापन व व्यवस्थापन केले. गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर (दादर), सातपाटी येथील आदि जनता हायस्कूल, माहीम येथील लोकमान्य विद्यामंदिर, मराठा मंदिर हायस्कूल (वरळी व ठाकुरद्वार),  इ.शाळांशी ते संबंधित होते. त्यांतील सुरुवातीच्या चिकित्सकमधे मुख्यत्वे अध्यापन व नंतरच्या सर्व शाळांत त्यांनी व्यवस्थापन पाहिले. साहित्यिक योगदानाचा पाठपुरावा करतानाच त्यांनी आपल्या अन्य जबाबदाऱ्याही  एक शिक्षक आणि स्वतःच्या पुस्तकांचे प्रकाशक म्हणून कार्यक्षमतेने पार पाडल्या. दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि सातपाटी येथील आदि जनता हायस्कूलच्या बाबतीतही ते शाळा व्यवस्थापनाच्या विशेष भूमिकेत होते; तरीही त्यांनी आपल्या घरासह सर्वआघाड्यांवर जबाबदारी उत्तम पार पाडली. त्यात अर्थात त्यांना पत्नीची मदत होतीच. या साऱ्या दरम्यान त्यांनी मुद्रक, पर्यटन केंद्र चालक, सिनेनिर्माता आणि कोशकार म्हणूनही काम केले. पत्नीच्या मदतीने त्यांनी आपल्या चारही मुलांना उत्तम शिक्षण देऊन जबबाबदार व प्रतिष्ठित नागरिकही घडवले.

१४) १९६५–१९८५ निवृत्तीचे (नाकारलेले) विरक्तजीवन

हे सारे समर्थपणे निभावतांना त्यांनी आपली वडिलार्जित मालमत्ता आणि तत्त्वे व धोरणेहीअबाधित ठेवली. अशा व्यक्तीला पुढेआपले हक्काचे निवृत्तिवेतनही शासकीय खाबूगिरीमुळे मिळू शकले नाही, ही शोकांतिकाच म्हणायची. हे शेवटचे वीस वर्षांचे शेवटपर्यंत ‘नाकारलेले’ जीवन होते. २० वर्षांचा हा सर्वात मोठा काळ होता जो कोणत्याही मोठ्या घटना आणि कोणत्याही ठोस निर्मिती शिवाय व्यतीत झाला. त्यांनी काटेकोरपणे आणि अत्यंत साधेपणाने आपले सेवानिवृत्तीचे आयुष्य व्यतीत केले. हे मुख्यतः १९६५-६६ मध्ये झालेल्या आजारपणामुळे होते. प्रत्येक गोष्ट महाग झाल्यामुळे काहीही लिहून ते प्रकाशित करण्याचा ते विचारच करू शकत नव्हते. त्यांनी सुरू केलेला मुलांचा ज्ञानकोश प्रकल्प अर्धवट सोडावा लागला होता अणि सक्तीची निवृत्ति पत्करावी लागली होती. ‘ज्ञानपारिजात’च्या तिसऱ्या परडीचे हस्तलिखित तयार असूनही तो खंड प्रकाशित झाला नाही. त्यांची तब्येत साथ देत नव्हती. एकेक करून त्यांचे कुटुंबातले जवळचे व इतर प्रियजन यांची निधने झाली.

‘पूर्वीची मुंबईही राहिली नाही.’ बदललेल्या मुंबईच्या नव्या वेगवान् जीवनासाठी आणि समाजातील बिघडत चाललेली नैतिक मूल्ये मानण्यास सामंत मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली होतीआणि ते स्वत:ला जुन्या काळातील मूल्ये मानणारा एक ‘मिसफिट’ म्हणून पाहत होते. बदललेल्या काळाशी त्यांना स्वतःला जुळवून घेता येत नव्हते. सतत नीतिमत्ता कमी झालेली पहाणे त्यांना अजिबात सहन होत नव्हते. सहा शाळांमध्ये काम केल्यावर आणि २२ वर्षे अध्यापन व शाळा व्यवस्थापनात घालवल्यानंतरही त्यांना त्यांचे हक्काचे शिक्षकांसाठीचे तदर्थ (एडहॉकपद्धतीने) निवृत्तिवेतन नाकारले गेले. कारण त्यांना विशिष्ट नियमांचे पालन करणे शक्य नव्हते आणि मंत्रालयातील एका विशिष्ट विभागाच्या ‘डेस्कऑफिसर’ च्या (आर्थिक) मागण्या सामंतांनी पूर्ण केल्या नाहीत. आपल्या केस फाईलसंबंधी त्यांनी त्या महाभागाचे नाव ‘साखळकर’ किंवा असेच काहीअसल्याचे तोंडी सांगितले की जो त्यांना त्यांचे कायदेशीर पेन्शन नाकारण्याच्या निर्णयासाठी जबाबदार होता. त्याने ती पेन्शन मंजूर करण्याकरिता आर्थिक मागणी केली होती. वसंतदादापाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हे घडले. या प्रकरणी १९७०-७२ च्या सुमारास केवळ दोनशे रुपयांची मागणी पूर्ण करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. खरंतर, नियमांनुसार २० वर्षे किंवा त्याहून अधिक एकत्रित कालावधीची सेवा असली तर त्या शिक्षकाला  तदर्थ पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. परंतु आधुनिक काळातील तो निर्लज्ज भ्रष्टाचारी अधिकारी बिनधास्त होता. सामंतांनी इतकी वर्षे जपून ठेवलेला आपली नैतिकता फार काळजीपूर्वक पाळण्याचा आग्रह धरला. शेवटी त्यांनी पैसे दिले नाहीत व हक्काच्य पेन्शनवर पाणी सोडले.

अमीट गोडीचा अमृतमहोत्सव त्यांचा ७५ वा वाढदिवस २४-१२-१९८४ रोजी त्यांच्या दादर टी.टी. येथील राहत्या घरी कुटुंबातील सदस्य आणि नातवंडे यांच्यासह एका मनमोकळ्या खासगी कार्यक्रमात त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी आणि काही मोजक्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला. यात उपस्थित असलेल्यांपैकी काही असे होते  – प्रा. एम.व्ही. धोंड, प्रा. टी.ए. कामत (दोघेही सामंतांचे एकेकाळचे चिकित्सकमधील मित्र व सहशिक्षक) आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वश्री जयवंतदळवी, ज्ञानेश्वरनाडकर्णी, रवींद्रपिंगे, मनोहर देवधर, मधु करंडे, ना.ग.शितूत इ.आवर्जूनउपस्थितहोते.

त्यानंतर दि. १७-०९-१९८५ रोजी पहाटे, ७६ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी काही महिने, त्यांचे निधन झाले. ही बातमी वृत्तपत्रांकरिता विशेष महत्त्वाची नसल्याने तिची विशेषशी दखलही घेण्यात आली नाही.

दीपक रघुवीर सामंत – मूळ नोव्हेंबर २००७ मध्ये तयार केले.०९-१-२०१९ रोजी पुनरावलोकन केले. २२-०४-२०२० रोजी संपादित केले. अंतिम १६-०७-२०