कै. श्री. रघुनाथ जगन्नाथ सामंत ऊर्फ “कुमार रघुवीर” ऊर्फ “रघुवीर सामंत”   

जन्म – २४ डिसेंबर १९०९ [वाई, जि. सातारा, ४१२८०३]. मृत्यू– १७ सप्टेंबर १९८५ [दादर (टीटी), मुंबई, ४०००१४]

क्रियाशील लेखनकाल – १९२९ ते १९६४. बहुआयामी मराठी साहित्यिक, कोशकार, एक आदर्श शिक्षणतज्ञ,प्रकाशक व उपक्रमशील व्यक्ति अशी त्यांची ओळख देता येते. (शब्दचित्र, कादंबरी, कथा, निबंध, बालवाङ्मय, काव्य, काव्यगायन,  कोशवाङ्मय, भाषांतर-रूपांतर, सिनेनिर्मिति, मुद्रण-प्रकाशन, पर्यटन इ. क्षेत्रांत सुमारे पस्तीस वर्षे कार्य केले.)

शिक्षक: बी.ए. (१९३४), बी.टी. (१९३८). सुमारे २२ वर्षे मराठी व इंग्रजीचे अध्यापन (शिक्षक-पर्यवेक्षक-मुख्याध्यापक). खालील शाळांत (१९३८ ते १९६१ या दरम्यान) अध्यापन आणि व्यवस्थापन केले:    

  • १) चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव, मुंबई. (१९३८ ते १९४९)  शिक्षक
  • २) शारदाश्रम विद्यामंदिर, भवानीशंकररोड, दादर, मुंबई. (१९५३ ते १९५५) मुख्याध्यापक
  • ३) आदिजनता हायस्कूल,सातपाटी, जि. पालघर. (१९५६ ते १९५८) मुख्याध्यापक  
  • ४) लोकमान्य विद्यामंदिर, माहीम, मुंबई. (१९५८ ते १९५९) पर्यवेक्षक   
  • ५) मराठामंदिर हायस्कूल, वरळी, मुंबई. (१९५९ ते १९६०)   मुख्याध्यापक
  • ६) मराठामंदिर हायस्कूल, ठाकुरद्वार, मुंबई. (१९६० ते १९६१)    मुख्याध्यापक   

एकंदर सुमारे २१-२२ वर्षे अध्यापन व बरोबरीनेच अन्य व्यावसायिक जबाबदाऱ्या एकाच वेळी समर्थपणे निभावल्या. 

साहित्यिक: वयाच्या १५-१६व्या वर्षी कुमारवयात लेखनाला सुरुवात केली. १९२९ मधे (वीस वर्ष्यांच्या कुमार वयात प्रसिद्ध झाले म्हणून) सुरुवातीला ‘कुमार रघुवीर’ या नावाने प्रसिद्धी मिळाली. मराठी साहित्याच्या विविध प्रकारात त्यानंतर जवळपास साडेतीन दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात (१९६५ पर्यंत) कार्यरत होते. त्यांचे एकंदर प्रकाशित वाङ्मय अंदाजे सात हजार छापील पृष्ठांचे आहे. जवळपास बावीस वर्षांच्या शालेय अध्यापन व व्यवस्थापनाच्या जबाबदारी दरम्यानच त्यांनी लेखन व प्रकाशनाचे त्यांचे कार्य एकाचवेळी मोठ्या कार्यक्षमतेने पार पाडले असे दिसते. त्यासाठी त्यांची लेखकाची भूमिका ते बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत जागरणे करून पार पाडीत असत हे इथे नमूद करायला हवे. त्यांची प्रकाशित ग्रंथसंपदा निरनिराळ्या बारा प्रकारात असून ती य़ेणेप्रमाणे –कादंबरी– ८ कादंबऱ्या, शब्दचित्र– ८ पुस्तके, लघुकथा– ४ पुस्तके,  लघुनिबंध– ४ पुस्तके, बालवाङ्गमय– ९ पुस्तके, काव्य–३ पुस्तके, व्यक्तित्वविकास– २ पुस्तके, चरित्रलेखन– २ पुस्तके, नाट्य– २ पुस्तके, शास्त्रीय– ३ पुस्तके, भाषांतर/रुपांतर –७ पुस्तके, रसग्रहण- ३ पुस्तके. या व्यतिरिक्त  मासिके (संपादन व प्रकाशन) – दोन नियतकालिके व पटकथालेखन – एक.  

चित्रपटनिर्मिति: मार्कंडेय अर्थात ‘चिरंजीव’ (निर्मितिकाल१९४१-४४). ‘चिरंजीव’ हा चित्रपट कै. बाळकृष्ण वि. सामंत,नाशिक यांनी ‘ज्योति चित्र’ या आपल्या फिल्म कंपनीतर्फे तयार केला होता. त्या बोलपटासाठी पटकथालेखन, संवादलेखन, गीतलेखन रघुवीर सामंत यांनी केले होते. त्यात आठ गाणी होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही सामंतांचेच होते. दुर्दैवाने त्या बोलपटाची तीन रिळे काही विचित्र अपघातामधे नष्ट झाल्याने त्याचे प्रदर्शनच होऊ शकले नाही. ‘चिरंजीव’ या बोलपटाचे नायक होते अनंत दामले. (प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांचे काका). त्यांना त्या काळात ‘नूतन पेंढारकर’ असे संबोधीत. संगीत दिग्दर्शक होते शाम सरदेसाई. ‘ज्योति चित्र’चे मालक व निर्माते होते बा.वि.सामंत, रघुवीर सामंतांचे चुलत बंधु.                                                                                                                              

प्रकाशन: आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीसच ‘हृदय’ या पुस्तकाबाबत कर्नाटक प्रकाशनाकडून  रघुवीर  सामंताना  कटू अनुभव आला. यामुळे त्यांचा असा ठाम समज झाला की प्रकाशक लेखकांना ‘बनवतात’. तिथून पुढे त्यांचा निर्णय झाला की यापुढे माझी सर्व पुस्तके मी माझ्या स्वतःच्या प्रकाशन संस्थेमार्फतच प्रकाशित करीन. हे तत्त्व त्यांनी जीवनभर कटाक्षाने अंमलात आणले.भाषांतर-रूपांतर, रसग्रहण अशी प्रायोजित स्वरूपाची पुस्तके वगळली तर अखेरपर्यंत त्यांची सारी पुस्तके त्यांनी स्वतःच्या प्रकाशन संस्थेमार्फतच प्रकाशित केली असे आढळते. त्यांच्या सर्व स्वतंत्र लेखनाचे हक्क त्यांच्या कुटुंबीयांकडे आहेत. त्यांनी आपल्या दोन मित्रांची पुस्तकेही मित्रत्वाच्या नात्याने छापली.         

मुद्रण: सागर साहित्य प्रिंटिंग प्रेस आणि अन्य एक प्रेस फेमस प्रिंटर्स या दोन ठिकाणी ते काही काळ भागीदार म्हणून संबंधित होते. १९४५-५५ च्या दशकात आणखीही काही व्यक्तींशी काही काळ मुद्रणविषयक जवळचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु पदरी फसवणूक आली. त्यात नुकसान तर पदरी पडलेच पण मूळ हेतूही साध्य न होता भरपूर मनस्तापही भोगावा लागला. स्वतःचे काम व दुसऱ्याला मदत काहीच झाले नाही.

पर्यटन: खंडाळा येथे मध्यमवर्गीयांना काटकसरीच्या दरात पर्यटनासाठी सोयीस्कर असे ‘घरकुल केंद्र’ १९४९ ते १९५३ या साडेचार-पाच वर्षांच्या कालावधीत चालविले. त्यांना नंतर तेथेच निवासी शाळाही सुरू करायची होती. परंतु घरकुल केंद्रात भरपूर नुकसान झाल्याने तो प्रयोग पाच वर्षांनी बंद करून ते मुंबईला पुन्हा अध्यापनात परतले. ती तडजोड त्यांना स्वीकारावीच लागली.                                                                                                                              

आत्मचरित्रलेखन: वाङ्मयक्षेत्रात एक राहिलेले काम म्हणजे त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले नाही. त्यांच्या जीवनाचे विविध पैलू निरखले तर ते किती रसपूर्ण झाले असते याची सहज कल्पना येते. १९५६-५७ च्या सुमारास ‘रहस्यरंजन’ चे श्री. काकतकर यांच्या नियमित भेटी होत. ते सामंतांना नेहेमीच आग्रह करीत की, “तुम्ही आत्मचरित्र लिहा. ते फारच रंजक होईल”. पण सामंतांनी ते कधीच मनावर घेतले नाही. ते सांगत की मला खरे लिहून कुणाला दुखवायचे नाही. मग घरातही सर्वांनी खूप आग्रह केला. नंतर त्यांनी टिपणे लिहिली. लेखनाला सुरुवातही झाली. पण हवी तशी बैठक कधी जमली नाही. आज ती टिपणे तशीच त्यांच्या पश्चात् पडून आहेत.