दीपक सामंत यांचे निवेदन –

मी दीपक सामंत, वय वर्षे ७५.

रघुवीर सामंत या सध्याच्या काळात प्रसिद्धी पासून पूर्णपणे अस्तंगत झालेल्या व विस्मृतीत गेलेल्या अशा, मराठीतील एके काळच्या प्रथितयश लेखकाचा मी मुलगा. कै. रघुनाथ जगन्नाथ सामंत उर्फ “कुमार रघुवीर” उर्फ “रघुवीर सामंत” यांचे प्रकाशित झालेले बहुविध साहित्य, त्यांनी त्यांच्या साडेतीन दशकांच्या सक्रिय कालात (म्हणजे साधारण १९२८-२९ ते १९६४-६५) वाङ्मयाच्या विविध प्रकारात व अन्य क्षेत्रात केलेले बरेच प्रयत्न, तसेच एक व्यक्ति, एक साहित्यिक, एक शिक्षक व एक कलाकार या नात्याने त्यांची नव्याने ओळख करून देणे, अशा विविध उद्देशांनी प्रस्तुत संकेत स्थळ आम्ही निर्माण करीत आहोत.

आजची स्थिति अशी आहे की मराठी भाषिक असलेल्या वा मराठी सांस्कृतिक दृष्ट्या जागरूक असलेल्या किंवा ज्यांना मराठी साहित्याची पुरेशी ओळख आहे अशा आजच्या पिढीतील बहुतांश लोकांनाही “कोण हे रघुवीर सामंत?” असा प्रश्न पडेल. अगदी अभ्यासू मंडळीनाही हाच प्रश्न पडण्याची शक्यता आहे. यात त्यांचा दोष मुळीच नाही. पण हेही तितकेच खरे की अशा साहित्यिक-सांस्कृतिक दृष्ट्या विस्मृतीत गेलेल्या व काही विशिष्ट कार्य केलेल्या व्यक्तीची नव्याने ओळख  करून देण्याची गरज असते. आणखी एक म्हणजे रघुवीर सामंत हे अशी एकच व्यक्ति आहेत असेही नाही. अन्य निरनिराळ्या क्षेत्रात आणखी अनेक अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्ति होऊन गेल्याअसतील की ज्यांची नव्याने ओळख व्यवस्थितपणे नोंदवणे गरजेचे आहे. तेव्हा ज्यांना कुणाला अशी जाणीव व माहिती असेल त्यांनी अशा तऱ्हेची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन, असे समाजोपयोगी काम जमेल तसे, जमेल तेव्हा, आपल्या आवाका-ऐपतीनुसार, आपण या समाजाचे एक जबाबदार घटक आहोत हे समजून उमजून आपण समाजाचे काही देणे  जरूर लागतो या भावनेने आवर्जून करायला हवे. तोच हा प्रयत्न सामंत कुटुंबीयांतर्फे आहे. सादर करीत असलेले रघुवीर सामंतांचे हे संकेतस्थळ वरील भावनेने केलेली छोटीशी सुरुवात आहे. सध्या आहे त्याहून ते अधिक परिपूर्ण व अभ्यासूंसाठी अधिक उपयुक्त करावे असे प्रयत्न आमच्याकडून यापुढेही केले जातील. मात्र त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल. दरम्यान सामंतांची बहुतेक सर्व पुस्तके डाउनलोडसाठी इथे आता उपलब्ध केलेली आहेत. पूरक संपादित माहिती जशी उपलब्ध होईल तशी वाढवली जाईल.आम्हा कुटुंबीयांव्यतिरिक्तअन्य कुणी ते तसे अधिक उपयुक्त होण्यासाठी पुढे येऊन साधार सूचना केल्या अथवा अधिक माहिती उपलब्ध करून दिली तर त्याचेही स्वागत! याचाच दुसरा दृष्टिकोन म्हणजे ज्यांनी त्यांना (किंवा अशा कोणत्याही व्यक्तीला) प्रत्यक्ष जीवनात जवळून पाहिले होते, त्यांचेबरोबर त्यांच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून कित्येक वर्षे काढली होती अशा मोजक्या हयात व्यक्तिंची ही विशेष जबाबदारी ठरते की त्यांनी वेळेवर असे प्रयत्न उचलून धरावेत व स्वतःहून त्यात सक्रिय भाग घ्यावा. तेही अगत्याचेच आहे.

इथे रघुवीर सामंतांच्या बाबतीतच बोलायचे झाले तर त्यांना प्रत्यक्ष जीवनात ओळखणाऱ्या काही थोड्या मोजक्याच व्यक्ती आता हयात असाव्यात.माझ्या या प्रस्तुत प्रयत्नाकडे त्याही दृष्टिकोनातून पाहिले जावे असे वाटते. निदान तशी अपेक्षा करणे गैर नसावे. मी माझ्या विद्यार्थीदशेत, कै. रघुवीर सामंतांना, त्यांचा एक मुलगा म्हणून, खूप जवळून पाहू शकलो. शक्य होते तेव्हा तेव्हा त्यांना त्यांच्या कामातही निरनिराळ्या प्रकारे मदत केली. तशी संधीही मला मिळत होती याचे मला समाधान (व सार्थ अभिमानही) आहे. विद्यार्थीदशेत (अगदी कॉलेजच्या दोन तीन वर्षांपर्यंत) काहीवेळा, विशेषतः भाषांतराची कामे करतेवेळी, मी त्यांचा लेखनिक म्हणूनही काम केले. कधी ते लेखनात गुंतले असताना त्यांना तलफ आली तर चहा करून दिला, कधी त्यांना हवी असलेली सिगारेट पानाच्या गादीवरून आणून दिली, कधी त्यांच्या पुस्तकांचे फॉर्म्स जुपून दिले व पुस्तकांचे गठ्ठे बांधून बाइंडिंगसाठी पाठवून दिले वा त्यांचेबरोबर गिरगाव-सचिवालय (तेव्हां ते मंत्रालय झाले नव्हते) या फेऱ्याही मी ट्रॅममधे त्यांचेबरोबर केल्या. या साऱ्या दरम्यान त्यानी मला दिलेली (अनुभव व ज्ञानाची) शिदोरीही मी बऱ्याचअंशी आजपावेतो जपली.

एक छोटीशी आठवण – अशा फेऱ्यांदरम्यान एकदा (साल १९६१-६२ असावे) त्यांचे सचिवालयातले काम लंचटाइम अगोदरच संपले व बारा वाजण्याचा सुमार होता त्यामुळे भरपूर उसंत होती. परतण्याची घाईही नव्हती. मग त्यंनी मला इरॉस थिएटरला सिनेमाचा मॅटिनी शो पहायला नेल्याचे स्मरते. माझ्या स्मरणानुसार सिनेमाचे नाव होते गन्स ऑफ डार्कनेस व हिरो होता डेव्हिड निवेन. त्या काळात लॅटिन अमेरिकन देशात होणाऱ्या रक्तरंजित क्रांतीवर तो चित्रपट आधारित होता. सिनेमा कोणते पहावेत व कशा दृष्टिकोनातून पहावेत याचा तो एक वस्तुपाठच होता.

सामंतांचे निधन १७ सप्टेंबर १९८५ रोजी दादर मुक्कामी झाल्यालाआता पस्तीस वर्षांचा प्रदीर्घ काळलोटला आहे. वयाच्या साठीनंतर ते नेहेमीच बोलून दाखवीत की, “माझ्या साहित्याची, विशिष्ट कामाची व श्रमांची पुरेशी दखल आपल्या समाजाने वा कुणा अभ्यासूंनी घेतली नाही कारण मी कधीही कुणाच्या पुढेपुढे केले नाही वा कोणत्याही विशिष्ट “कंपू” मधेही सामील नव्हतो.जे बाहेरच्या लोकात मला आढळले तेच माझ्या काही नातेवाइकांतही. माझ्या कठीण काळातही मी जन्मभर माझी एकांडी शिलेदारी जपत राहिलो. मला मित्र लाभले पण त्याहून जास्त जवळचेच सुप्त दुस्वासी लोक होते. माझा फटकळपणाही मला भोवला असावा. विशेषतः माझी सर्व पुस्तके मी स्वतःच्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली; त्यामुळेही मी कदाचित दुर्लक्षित राहिलो. यामुळे मी जसा लेखक समुदायात विशेष पसंत नव्हतो तसाच प्रकाशक वर्गातही नव्हतो. अर्थात याला काही सन्माननीय अपवादही होते. पण यामुळे१९४५ नंतर माझी गाडी नेहमीच सायडिंगला असे. मी स्वतःहूनही दूर राहिलो.अर्थात माझी याबद्दल कोणतीच तक्रारही नाही”.

आता पहातापहाता त्यांच्या मृत्यूनंतर इतका दीर्घ काल गेल्यानंतर, कुणालाही (म्हणजे उत्सुक वा साक्षेपी वाचक अथवा कुणा गंभीर वाङमयीन अभ्यासकालाही) कै. रघुवीर सामंतांचे साहित्य उपलब्धच नाही. तसेच “मराठी भाषेने कायम झपाटलेली, आणि नेहमी नव नवे प्रयोग करणारी एक व्यक्ती” ही त्यांची ओळखही पूर्णपणे पुसली गेलीआहे. त्यांचे नाव आताजवळपास अज्ञात आहे. नाही म्हणायला विश्वकोश व विकिपीडियावर त्यांचेवर सुयोग्य व आटोपशीर नोंदी जरूर पहायला मिळतात. त्यांचे सहज उपलब्ध नसलेले असलेले सर्व वाङमय आता सर्वांनाच सहजपणे डाउनलोड करिता उपलब्ध करून देणे आणि मराठी वाचकांना त्यांची नव्याने ओळख करून देणे हे दोन हेतु मनात ठेवून हे संकेतस्थळ निर्माण करीत आहोत. तत्पूर्वी साधारण २००६-०७ पासून मी गेली बरीच वर्षे हाती लागलेले त्यांचे सर्व प्रकाशित वाङमय व घरात असलेली शिल्लक कागदपत्रे एकत्र करून स्कॅन करू लागलो. त्यांचेसंबंधी मला उपलब्ध व ज्ञात असलेल्या माहितीवर आधारून टिपणे व व्हॉइस ट्रॅक्सही तयार केले. त्यांच्या स्वतःच्या आवाजात उपलब्ध असलेले कॉम्पॅक्ट कॅसेटवरील व्हॉइसट्रॅक्स व हाती लागलेल्या मोजक्याच ध्वनिमुद्रिका (वैयक्तिक व सिनेमाच्या) एकत्र केल्या. ते सारे कागद स्कॅन, ट्रॅक्स व ध्वनिमुद्रिका डिजिटाइज केले. ते आता डेस्कटॉप वा लॅपटॉपवर पहाता ऐकता येतात. या साऱ्या श्रमांचे फलित म्हणून आज हे संकेतस्थळ कै. रघुवीर सामंतयांच्या कुटुंबीयांतर्फे कार्यान्वित करणे खूप सोपे गेले. ते सादर करताना मलाअत्यंत आनंद होत आहे. तेही त्यांच्या स्मृतिदिनी (त्यांचे निधन १७ सप्टेंबर १९८५ रोजी झाले तो हरितालिकेचा दिवस होता) ते कार्यान्वित करू शकतो आहोत याचा विशेष आनंद आहे. मला त्यांच्या व माझ्या आईच्या तोंडून ऐकलेली व म्हणून ज्ञात असलेली वा प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेली माहितीही मी ऑडियो ट्रॅक्स स्वरूपात तयार करीत आहे. तसेच काही स्कॅन केलेली कागदपत्रे व हस्तलिखितेही पुढील वाढीव भाग म्हणून नंतर क्रमा-क्रमाने सादर करता येतील. त्यासाठी निश्चित कालावधी आताच सांगणे कठीण आहे.

यापूर्वीही आम्ही भावंडांनी आमची आई (सौ स्नेहल सामंत) हयात असतांना काही प्रयत्न केले. त्या अंतर्गत आम्ही रघुवीर सामंतांची (कै भाईंची) दोन पुस्तके मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे प्रकाशित करवून घेतली. १९८७ मधे “भेटेन पुन्हा” या शीर्षकाची प्रदीर्घ कादंबरी व  नंतर १९९३ मधे प्रा वि. शं.चौघुले यांनी लिहिलेले प्रायोजित पुस्तक “बेरीज व वजाबाकी”या शीर्षकाचे, अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. तसेच त्यानंतर सामंतांची दोन प्रमुख पुस्तके (‘उपकारी माणसे’ या कादंबरी मालिकेचे तीन खंड (प्रसिद्धी १९३८ ते १९४०) व हृदय (प्रसिद्धी १९३२) ही सुरुवातीची पुस्तके निवडून त्यांचे डीटीपी करून ती “मराठी पुस्तके. ओआरजी” (marathipustake.org) या संकेतस्थळावर सर्वांसाठी मुक्तपणे मांडली. अर्थात आजही ती तिथे उपलब्ध आहेत. त्याला आता सुमारे ८-१० वर्षे उलटून गेली असावीत.मात्र वरील सर्व प्रयत्न करण्यात आम्हा सर्वांची बरीच शक्ती, वेळ (व अर्थात रक्कमही) खर्ची पडली. आता हे प्रस्तुतचे स्वतंत्र संकेतस्थळ अस्तित्वात आल्यामुळे २००६-०७ नंतर गेल्या १२-१४ वर्षांत घेतलेले श्रम, घातलेला वेळ (व अर्थात सोसलेला खर्चही) आता कारणी लागतोय असे म्हणावेसे वाटते. आता उर्वरित बरीच पुस्तके मुक्तपणे सर्वांना उपलब्ध होत आहेत. अन्य जे साहित्य उपलब्ध होऊ शकेल ते सारेही यथावकाश नंतर वेळोवेळी वाढीव माहितीच्या स्वरूपात येथे देता येईल. त्यांची बरीच हस्तलिखित कागदपत्रे व अन्य पत्रव्यवहार असे बरेच काही साहित्य काळाच्या ओघात अपघाताने नष्टही होऊन गेले. येथे आता त्याबद्दल फक्त दुःख व्यक्त करण्याखेरीज हाती फारसे काही उरलेले नाही.जे मागे उरले किंवा हाती राहिले आहे ते मनात धरलेले उद्देश पूर्णतेला नेण्यासाठी पुरेसे सक्षम आहे असे नक्की वाटते.आत्ता इथे जे दिले आहे त्यात कोणी साधार सुधारणा अथवा परिर्पूणता आणण्यासाठी काही सूचना केल्यास, चूक राहिली असल्यास ती सुधारण्यास  सुचवले व/वाअणखी काही मार्गाने योगदान दिल्यास त्यांचे स्वागत. ह्या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात बऱ्याच वर्षांपूर्वी मी (२००५-०६ मधे माझ्या पेशातून निवृत्त झाल्यावर) सामंतांचे सर्व साहित्य एकत्र करून सुरक्षित ठेवण्याच्या प्रमुख उद्देशाने केली. त्यावेळी अशा संकेतस्थळाची स्पष्ट कल्पना नजरेसमोर निश्चितच नव्हती. दरम्यान आमच्या आईचे निधन २००६मधे झाले. सरत्या वर्षांबरोबर जसजसे काम पुढे सरकू लागले तसेच घराच्या साफसुफीत आणखी काही कागदपत्रे हाती लागत गेली तेव्हा या कामाचा आवाका व महत्त्व ठळकपणे उमजत गेले.      

 त्यानंतर साधारण ३-४ वर्षांपूर्वी हे संकेतस्थळ निर्माण करण्याविषयी अधिक स्पष्टपणे कल्पना सुचली आणि तसा निर्णय घेऊन त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ते जमेलच अशी खात्रीही नव्हती. सारे प्रकाशित साहित्य स्कॅन करण्यावर काम सीमित न ठेवता अन्य कागदपत्रे स्कॅन व लॅमिनेट करण्याचा निर्णयही घेण्यात आला. बरोबरीनेच ऑडियो ट्रॅक्सचे व ध्वनिमुद्रिकांचे कामही वाढले. यामुळे वेळ (व खर्चही) खूपच वाढला. मात्र या प्रकल्पाचे आमच्या कुटुंबासाठी असलेले महत्त्व लक्षात घेऊन ते तसेच सुरू ठेवण्यात आले. ते कुणा संस्थेच्या वा विद्यापीठाच्या हाती सोपवून मोकळे व्हावे असाही सल्ला-विचार पुढे आला. मात्र तसे घडले नाही. आता ते पूर्ण झाले यात सारे काही साध्य झाले. यात एका गोष्टीची रूखरूख जरूर लागून राहील. ती म्हणजे हेच काम जर कै. स्नेहल सामंत (पूर्वाश्रमीच्या वेणू गव्हाणकर) यांच्या उपस्थितीत होऊ शकले असते तर ते अधिकच उचित ठरले असते. हे संकेतस्थळ निर्मिण्यात माझ्या विचारांचा व श्रमांचा महत्त्वाचा हात असला तरी हेही मान्य करावे लागेल की या कामाने मला एक वेगळी दिशा दिली. माझ्या निवृतीनंतरही ‘मी अजून एका उपयुक्त कामातच गुंतलोय्’ ही जाणीवही दिली. या साऱ्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी ही सारी वर्षे मजेत गेली. हे काम सुरू करण्यापूर्वी, २००६ पर्यंत, आई हयात होती ती काहीना काही उपयुक्त तपशील घरात बोलता बोलता सांगत असे तेही मनांत साठले होते; तेही कामी आले. माझ्या व्यतिरिक्त घरातल्या सदस्यांनीही जमेल तशी (मजकूर संपादनात व तांत्रिक बाजू संभाळण्यात) मदत केली. मला त्यातल्या तांत्रिक बाबीत फार काही कळत नाही. यात छाया देव, अश्विनी देव, ओंकार सामंत व केदार सामंत यांचा विशेष उल्लेख करायला हवा.त्याचबरोबर बाहेरच्याही काही अनुभवी व्यक्तींचे सहकार्य, क्रियाशील मदत तसेच मोलाचा सल्ला, चर्चा व त्यांच्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनही मिळाले. त्याबद्दलही  इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. ज्यांनी अशी मदत केली त्यांचे मी व माझे कुटुंबीय आभारी आहोत. या प्रकल्पासाठी डॉ. विवेक पाटकर,  श्री. मंगेश कुलकर्णी, श्रीमती सुषमा पौडवाल या साऱ्यांची बहुमोल मदत झाली हे  नमूद करण्यात आनंद होतो. आमच्याकडे उपलब्ध नसलेली सामंतांची काही मोजकी, जुनी व सुरुवातीच्या काळातली काही पुस्तके निरनिराळ्या ग्रंथालयांतून शोध घेऊन ती उपलब्ध करण्याचे महत्त्वाचे काम श्री विशाल रणखांब यांनी केले त्यांचेही आभार.

हे संकेत स्थळ निर्मिताना कोणत्याही व्यक्तीचा (हयात अथवा हयात नसलेल्या) अधिक्षेप अथवा अपमान करण्याचा हेतु मनात ठेवलेला नाही. विशेषतः सामंतांसंबंधी जे कौटुंबिक किंवा अन्य उल्लेख आले आहेत किवा तपशील लिहिले आहेत ते सारे सत्यावर आधारित तर आहेतच पण तो आता एक इतिहास बनून उरला आहे. त्यामुळे ते उल्लेख आता करणे काही गैर नाही असे वाटते. तसेच अधिक अवघड होतील असे तपशील आम्ही टाळलेही आहेत. त्यामुळे जे काही दिले आहे ते शक्य तितके सौम्यपणे उल्लेखिलेले आहे. तथापि तशा उल्लेखांमुळेही चुकून, अभावितपणे कुणाला कुणाचा अधिक्षेप झाला असे वाटले,  अथवा ते अप्रिय उल्लेख व कथन टाळले असते तर बरे झाले असते, असे वाटले तर ते साहजिक आहे. पण असेही वाटते की सामंतांविषयी ती माहिती व तपशील सुस्पष्ट मांडल्याखेरीज एक व्यक्ती, एक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख व त्यांची मानसिकता पूर्ण उलगडू शकली नसती. पण त्या साऱ्यामुळे सामंताची प्रतिमा नेहेमीच जीवनात बव्हंशी अपयशी व्यक्ती अशी वाटावी. यासंबंधात काही अवघड आणि अप्रिय (पण वस्तुस्थितीला अनुसरून व सत्यघटनांवर आधारून असलेले व आवश्यक तितकेच) तपशील दिले आहेत. मात्र त्याबद्दलही येथे मी आगाऊच बिनशर्त दिलगिरी व्यक्त करून हे निवेदन शेवटास नेतो.

तिथीने त्यांचे निधन हरतालिकेच्या दिवशी झाल्याने २१ ऑगस्ट २०२० ही तारीख निवडली आहे.

दीपक रघुवीर सामंत

(कै. रघुवीर सामंत यांचे कुटुंबीयांतर्फे) हरतालिका,दि.२१/८/२०२०.(३५वा रघुवीर सामंत स्मृतिदिन तारखेने १७-०९-२०२० असा आहे)
रो हाऊस ७, शिवपार्वती सगृनिसं (म), नेरूळ (पू), से. २१, नवी मुंबई, ४००७०६. +91-22 2770 3393; +91 – 93222 90814

दि. १६-०७-२०२०